Join us   

५ चुका कायम करत असाल तर तुमच्या किडनीचं आरोग्य धोक्यात आहे! - सोप्या गोष्टी, आजार टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 2:45 PM

5 Mistakes That can harm Kidneys health : किडनी चांगली ठेवायची असेल तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी

किडनी हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनी महत्त्वाचे काम करत असते. खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रुपांतर होते, हे रक्त योग्य पद्धतीने घुसळून संपूर्ण शरीराला पोहचविणे आणि त्यातील अनावश्यक घटक मलमूत्राच्या माध्यमातून बाहेर टाकण्यासाठी किडनी अविरत कार्य करत असते. पण या किडनीच्या आरोग्याकडे आपण योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही तर किडनी खराब होते. अशाप्रकारे किडनी एकदा खराब व्हायला लागली की शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडत नाहीत, त्याचा शरीरावर ताण यायला लागतो आणि आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात (5 Mistakes That can harm Kidneys health). 

आपली जीवनशैली योग्य असेल तर हे अवयव दिर्घकाळ उत्तम पद्धतीने कार्यरत राहतात. मात्र आपण शरीराकडे दुर्लक्ष केले आणि चुकीची जीवनशैली अवलंबली तर मात्र हे अवयव खराब होत जातात. किडनी चांगली ठेवायची असेल तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी, अन्यथा किडनीवर ताण येऊन त्या लवकर खराब होतात आणि मग डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणूनच रोजच्या व्यवहारात आवर्जून टाळायला हव्यात अशा ५ गोष्टी कोणत्या ते पाहूया... 

(Image : Google)

१. योग्य प्रमाणात पाणी न पिणे 

तुम्ही नियमितपणे भरपूर पाणी पित नसाल तर त्याचा किडनीवर परीणाम होतो. डिहायड्रेशन झाल्याने किडनीवर प्रेशर येते, ज्यामुळे किडनी स्टोन आणि इतर समस्या निर्माण होतात. म्हणून दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यायला हवे. यामुळे किडनीतील जास्तीचे सोडीयम आणि टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होईल. 

२. युरीन बराच वेळ दाबून ठेवणे

काही वेळा बाहेर असल्यामुळे किंवा अन्य काही कारणाने आपण युरीन बराच काळ रोखून धरतो. असे केल्याने त्याचा किडनीवर दाब येऊ शकतो आणि किडनी खराब होऊ शकतात. ब्लॅडर ठराविक काळाने खाली करणे युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि किडनीच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे शरीराच्या संकेतांकडे योग्य पद्धतीने लक्ष देऊन त्यानुसार काळजी घ्यायला हवी. 

३. प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाणे 

काही जणांना प्रत्येक पदार्थांवर वरुन मीठ घालून खाण्याची सवय असते. मीठ जास्त प्रमाणात खाणे किडनीच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते त्यामुळे मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवायला हवे. 

(Image : Google)

४. सतत पेनकिलर्स घेणे 

अनेकांना डोकेदुखी, अंगदुखी, अॅसिडीटी किंवा ताप यांसारख्या तक्रारी वारंवार उद्भवतात. या तक्रारी आपल्याला सामान्य वाटत असल्या तरी त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या उपाययोजना करणे अतिशय महत्त्वाचे असते. मात्र झटपट बरे होण्यासाठी आपण डॉक्टरांकडे न जाता थेट मेडीकल स्टोअरमध्ये जाऊन पेनकिलर्स घेतो. याचा किडनीवर थेट परीणाम होतो आणि तिचे आरोग्य खराब होते. 

५. योग्य पोषण न मिळणे 

आपण जे अन्न खातो त्यातून आपल्याला पुरेसे पोषण मिळत नसेल तर त्यामुळे आपण कुपोषित राहण्याची शक्यता असते. वरुन दिसायला आपण धडधाकट दिसत असलो तरी शरीरात पुरेशी ताकद नसते तसेच प्रतिकारशक्तीही कमी झालेली असते अशाने सतत आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. व्हिटॅमिन्स आणि खनिजे नीट मिळाली नाहीत तर किडनी नीट काम करत नाहीत. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल