Join us   

मनसोक्त होळी खेळून थकवा आला? ५ टिप्स, व्हाल पुन्हा फ्रेश-ताजेतवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2023 6:24 PM

5 Post Holi Detox Tips : धुलवडच्या दुसऱ्या दिवशी आवर्जून काही गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो.

होळी आणि धुलीवंदन साजरे करायचे म्हणजे आपल्या उत्साहाला एकदम उधाण येते. कोणाच्या घराच्या टेरेसवर, अंगणात, सोसायटीच्या पार्कींगमध्ये किंवा अगदी खास आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टीमध्ये आपण मनसोक्त होळी खेळतो. एकमेकांना रंग लावून पाणी उडवणे, फुगे फोडणे यांसारख्या गोष्टी करताना आपल्याला खूप मजा येते. हे जरी खरे असले तरी बराच वेळ पाणी खेळल्याने किंवा उन्हात राहील्याने नंतर आपल्याला या सगळ्याचा थकवा येतो (5 Post Holi Detox Tips). 

आपण नियमित व्यायाम करत नसलो किंवा आपल्याला जास्त दगदग करायची सवय नसली तर पाण्यात खेळण्याने आपलं अंगही खूप दुखतं. खेळताना आपल्याला लक्षात येत नाही पण नंतर याचा त्रास होतो. मग अंगदुखी, डोकेदुखी अशा समस्या उद्भवतात. अशावेळी होळी आणि धुलवडच्या दुसऱ्या दिवशी आवर्जून काही गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पूजा भार्गवा यासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स देतात त्या कोणत्या, पाहूया. 

१. ताजी फळं आणि भाज्या खा

होळी पार्टीच्या निमित्ताने आपण तळकट, मसालेदार आणि गोड असे काही खाल्लेले असते. त्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी सफरचंद, किवी, पपई, बेरीज अशी लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळं आवर्जून खावीत.

२. भरपूर पाणी प्या

अनेकदा होळीच्या निमित्ताने काही जण दारु घेतात. तसेच सॉफ्ट ड्रींक, वेगवेगळी सरबते, चहा-कॉफी यांच्या निमित्ताने शरीरात जास्त प्रमाणात साखर जाते. तसेच या पेयांमुळे आपल्याला जास्त वेळा लघवीला जावे लागते आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. पण उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्य उत्तम ठेवायचे तर साखर नसलेली पेय भरपूर घ्यायला हवीत.

३. आतड्यांना आराम देणारे पदार्थ घ्या

आपली आतडी हा पोटातील महत्त्वाचा भाग असतो. त्यांना ताण आला तर आरोग्याची सर्व यंत्रणा बिघडण्याची शक्यता असते. मात्र आहारात दही, ताक, पनीर यांचा समावेश केल्यास आतड्यांना आराम मिळण्यास फायदा होतो. 

४. घरी केलेले अन्न खा

होळीला आपण भरपूर खेळतो आणि दमल्यावर दणकून खातोही. मात्र त्यामुळे नंतर पोटाला आराम मिळावा म्हणून घरी बनवलेले हलके पदार्थ खा. यामध्ये खिचडी, भात-वरण, पोहे, उपमा यांसारख्या हलक्या पदार्थांचा समावेश असावा.

५. पुरेशी झोप घ्या

झोप ही आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे होळी खेळून थकवा आला असेल तर त्यानंतर पुरेशी झोप घ्यायला हवी. झोप चांगली झाली तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यासाठी झोपताना मधुर गाणी ऐकणे, वाचन करणे असे काहीही करु शकता. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स