कॉन्स्टीपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता. सध्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना हा त्रास होतो. सततची बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती, अपुरी झोप आणि इतर अनेक गोष्टींमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो (5 Reasons Behind Constipation). त्यामुळे संडासला गेल्यावर कुंथायला लागणे आणि खालच्या बाजूला दुखणे, शौचाला घट्ट होणे, बाहेर येताना त्रास होणे, पोट योग्य पद्धतीने साफ न होणे अशा समस्या उद्भवतात. पण आपली जीवनशैली चांगली असेल तर आपण या समस्यांपासून नक्कीच दूर राहू शकतो. प्रसिद्ध मेडिकल एक्सपर्ट अॅमी गुडसन यांच्या म्हणण्यानुसार आहाराच्या बाबतीत आपण अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवू शकतो पाहूया...
१. आहारात फायबरचे कमी प्रमाण
फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये, डाळी, बिया यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. पण सध्या आपण सगळेच सातत्याने जंक फूड आणि बाहेरचे पदार्थ खात असल्याने आपल्या शरीराचे पुरेसे पोषण होत नाही. आहारात शरीराला उपयुक्त अशा सर्व पदार्थांचे संतुलन नसल्याने शरीराला फायबर मिळत नाही. फायबर हे प्रामुख्याने शरीराला पोषण देण्यापेक्षा शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याचे काम करतात. पण पुरेसे फायबर मिळाले नाहीत तर शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडत नाहीत आणि मग शौचाला त्रास होतो.
२. पाणी कमी पिणे
अनेकदा कामाच्या नादात आपण पाणी प्यायचे विसरतो. आपण कामात किंव एखाद्या गोष्टीत इतके गढून जातो की आपल्याला तहान लागली होती हेही अनेकदा आपल्या लक्षात राहत नाही. व्यक्तीला दिवसाला किमान ३ ते ४ लीटर पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर हवेतील उष्णतेमुळे आपल्याला सतत तहान लागते. मात्र आपण पुरेसे पाणी न प्यायल्यास खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडत नाहीत. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.
३. फळांची साले काढणे
फळांच्या सालांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. पण अनेकदा आपण फळांची साले काढून फळे खातो. सफरचंद, चिकू किंवा इतरही फळांची साले काढल्यामुळे फळांतील अनेक उपयुक्त घटक शरीराला मिळत नाहीत. ही साले टाकून दिल्याने फळांचे पोषण कमी होते आणि शौचास घट्ट होते. त्यामुळे फळे सालीतसकट खाणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवायला हवे.
४. प्रमाणाबाहेर चीज खाणे
शरीराला प्रोटीन मिळावे म्हणून आपण बऱ्याचदा चीज किंवा डेअरीची उत्पादने जास्त प्रमाणात खातो. पण ज्यांचा कोठा थोडा जड असतो त्यांना दुग्धजन्य पदार्थांमुळे शौचास घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे चीज योग्य प्रमाणातच खायला हवे. याबरोबरच चीज खात असल्यास सॅलेड किंवा धान्यांचा समावेश आहारात योग्य प्रमाणात करायला हवा म्हणजे मोशन क्लिअर होण्यास मदत होते.
५. अल्कोहोल किंवा कॅफेन
या दोन्ही घटकांनी शौचाला कडक होण्याची शक्यता असते. तसेच प्रमाणाबाहेर अल्कोहोल किंवा कॅफेनचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास अडचणी येतात. पोट चांगले साफ नसेल तर आपल्याला करपट ढेकर येणे, डोके दुखणे, अपचन अशा बऱ्यात तक्रारींचा सामना करावा लागतो. पोट साफ नसेल तर त्वचेवरही त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे अल्कोहोल आणि कॅफेन शक्यतो टाळलेले केव्हाही चांगले.