Join us   

सतत काही ना काही गोड खायची इच्छा होते? ५ महत्त्वाची कारणं, शुगर क्रेव्हिंग ठरु शकतो धोक्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 12:22 PM

5 Reasons behind sweet food cravings : सतत गोड खाण्याची इच्छा का होते यामागे काही कारणे आहेत.

आपल्याला अनेकदा नाश्ता किंवा जेवण झालं की गोड खावसं वाटतं. इतकंच नाही तर मधल्या वेळेतही आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते. एखादवेळी आपण असे गोड खातोही. पण गोड हे थेटे रक्तातील साखरेशी निगडीत असल्याने अशाप्रकारे सतत गोड खाणे आरोग्यासाठी योग्य नसते हे आपल्याला कळते. गोड खाल्ल्याने आपल्याला बरे वाटत असले तरी लठ्ठपणा, आळस यांसारख्या समस्यांसाठीही गोड खाणे चांगले नसते. पण अशाप्रकारे सतत गोड खावेसे वाटण्यामागे नेमकी काय कारणे असतात. सतत गोड खाण्याची इच्छा का होते यामागे काही कारणे आहेत. ती कारणे कोणती हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे (5 Reasons behind sweet food cravings).  

१. प्रोटीनची कमतरता

प्रोटीन ही अशी गोष्ट आहे ज्याची शरीरीत निर्मिती होत नाही. तर ते बाहेरुनच आपल्याला घ्यावे लागतात. हाडं, स्नायू यांच्या बळकटीसाठी प्रोटीन्स अतिशय महत्त्वाचे असतात. या प्रोटीन्सचा आहारात कमी समावेश असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. त्यामुळेच प्रोटीनची कमतरता असणाऱ्यांना अनेकदा गोड खाण्याची इच्छा होते. 

(Image : Google)

२. फायबरची कमतरता 

प्रोटीनप्रमाणेच फायबरही आपल्या आहारात अतिशय महत्त्वाचे असतात. रक्तातील साखरेचे संतुलन राहण्यासाठी फायबर उपयुक्त असते. फायबर असलेले पदार्थ जास्त प्रमाणात आहारात घेतले तर रक्तात साखर चांगल्या प्रकारे शोषली जाते. पण त्याची कमतरता असेल तर साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आहारात फळं, भाज्या, धान्य यांचा भरपूर समावेश ठेवल्यास सतत गोड खायची इच्छा होत नाही. 

३. हार्मोन्सचे असंतुलन

केवळ भूकेचे हार्मोन्सच नाही तर ताणतणाव वाढवणाऱ्या हार्मोन्समुळेही आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते. आपल्याला जास्त ताण असेल तर शरीरातून कॉर्टीसोल नावाचा हार्मोन बाहेर पडतो, ज्यामुळे भूक वाढते आणि आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते. 

४. झोप पूर्ण न होणे 

काहीवेळा काम, इतर जबाबदाऱ्या, स्क्रीन यांचा झोपेवर परीणाम होतो. झोप कमी झाली की आपोआप आपल्याला गोड जास्त खाण्याची इच्छा होते. योग्यप्रकारे झोप घेतली नाही तर हार्मोनल बॅलन्स बिघडतो आणि सतत गोड खावेसे वाटते.

५. डीहायड्रेशन

थंडीच्या दिवसांत आपल्याला तहान कमी लागते. शरीरात पाणी कमी गेल्याने डीहायड्रेशन होते आणि नकळत आपल्याला भूक लागल्यासारखे वाटते. अशावेळी एकतर आपण गोड पेय पितो किंवा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. त्यामुळे डीहायड्रेशन हे गोड खाण्याचे एक महत्त्वाचे कारण असू शकते.     

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनालाइफस्टाइल