नारळ पाणी म्हणजेच शहाळ्याचं पाणी अनेक गुणांनी युक्त असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. म्हणूनच नियमितपणे नारळपाणी प्यावे असे सांगितले जाते. नारळाचे पाणी हे सलाईनप्रमाणे काम करत असल्याने रुग्णांना ते दिले जाते. इतकेच नाही तर लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, कमजोर व्यक्ती यांना आवर्जून शहाळ्याचे पाणी पिण्यास सांगितले जाते. हे सगळे जरी खरे असले तरी काही लोकांसाठी मात्र हेच नारळपाणी त्रासदायक ठरु शकते (5 reasons why coconut water is not for everyone).
खनिजे, पोटॅशियम, सोडीयम, मँग्नेशियम, अँटीऑक्सिडंटस आणि इतरही अनेक घटकांचा उत्तम स्त्रोत म्हणून डॉक्टरही काहीवेळा शहाळ्याचं पाणी पिण्याचा सल्ला देतात. आता इतके गुणधर्म असूनही नारळ पाणी घातक कसे काय असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. तर या पाण्यात असणाऱ्या घटकांचा शरीराला उपाय होण्याऐवजी अपाय होत असेल तर? वर्षभर सहज उपलब्ध असणारे शहाळे नेमके कोणी घ्यायला हवे आणि कोणासाठी ते चांगले नाही हे समजून घ्यायला हवे. म्हणजे आपण नक्की कोणत्या गटात मोडतो हे समजायला अवघड जाणार नाही.
१. पोटॅशियम
शहाळं पाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. अनेकांसाठी ते फायदेशीर असले तरी ज्यांना किडणीच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी ते घातक ठरु शकते. शरीरातील पोटॅशियमची पातळी वाढणे हृदयाचे ठोके वाढण्यावरही परीणाम करते आणि ते घातक ठरु शकते.
२. कॅलरीजचे प्रमाण
इतर पेयांपेक्षा नारळ पाण्यात कॅलरी कमी असल्या तरी असतातच. जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी जास्त प्रमाणात नारळ पाणी घेतले तर त्यांच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते.
३. नैसर्गिक गोडवा
नारळ पाण्यात नैसर्गिकपणे असणारी साखर ही मधुमेह असणाऱ्यांसाठी घातक ठरु शकते. प्रोसेस्ड शुगरपेक्षा ही साखर आरोग्यदायी असली तरी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यासाठी ती कारणीभूत ठरु शकते.
४. इलेक्ट्रोलाइट ड्रींकला पर्यायी म्हणून उपयोगी नाही
नारळ पाण्यात काही प्रमाणात इलेक्ट्रोलाइटस असतात हे खरे आहे. मात्र जे खूप जास्त प्रमाणात वर्कआऊट करतात त्यांच्यासाठी ते पुरेसे नसते. जे अॅथलिटस खूप जास्त फिजिकल अॅक्टीव्हीटी करतात त्यांना शरीराची ताकद भरुन येण्यासाठी वेगळ्या प्रकारचे स्पोर्ट ड्रिंक तयार केले जातात.
५. पचनाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता
नारळ पाण्यामुळे डायरीयासारखी समस्या उद्भवू शकते. यामध्ये असणारे फायबर्स किंवा नैसर्गिक साखर यामुळे पोट बिघडू शकते. तुमचे पोट सेन्सिटीव्ह असेल तर थोड्या थोड्या प्रमाणात नारळ पाणी घेणे किंवा न घेणेच अधिक चांगले असते.