आज बहुतांश लोकांना पचनाच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्व वयोगटात पचनाचे विकार पाहायला मिळतात. पचन व्यवस्था ही कमजोर असल्यास , नीट काम करत नसल्यास पचनाचे विकार होतात. पचन व्यवस्था बिघडण्यास अनेक कारणं कारणीभूत ठरतात . त्यात अवेळी जेवण करणं, भुकेपेक्षा जास्त खाणं, उभ्या उभ्या, चालत फिरत जेवणं आणि चुकीची जीवनशैली ही कारणं पचन व्यवस्थ बिघडवतात असं तज्ज्ञ म्हणतात. पचन व्यवस्था नीट काम करत नसेल तर पोटात गॅस होणं, पोटावर किंवा आतड्यांवर सूज येणं, अपचन, पोटात दुखणं, जुलाब होणं यासारखे पचनाचे विकार होतात.
पचनाचे विकार हे दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर होतात, त्यांच्याकडे वेळीच लक्ष देणं, आपली पचन व्यवस्था मजबूत करणं हाच यावरच उपाय. प्रसिध्द्द आयुर्वेद तज्ज्ञ अबरार मुल्तानी सांगतात की आपली पचन व्यवस्था नीट ठेवण्यासाठी बाहेरुन गोळ्या औषधं खाण्याची अजिबात गरज नाही किंवा पचन सुधारणारं औषध बाजारात शोधण्याची आवश्यकता नाही. कारण पचन व्यवस्था सुधारण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात आहेत. त्या नियमित आपल्या पोटात जायला हव्या याकडे लक्ष दिल्यास पचन व्यवस्था चांगली राहील. डॉक्टर मुल्तानी म्हणतात की आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यात पचन व्यवस्थेची भूमिका खूप महत्त्वाची असते. आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषक घटक अन्नाचं व्यवस्थित पचन झाल्यास मिळतात. त्यामुळे आपली पचन व्यवस्था सुदृढ ठेवण्याकडे आधी आपलं लक्ष असलं पाहिजे.
पचन सुधारणार्या 5 गोष्टी
Image: Google
1. आलं: डॉक्टर अबरार मुल्तानी सांगतात की आलं हे पचन सुधारण्यास मोलाची मदत करतं. पोटात गडबड असल्यास, पोट अस्वस्थ असल्यास ते शांत करण्याचं काम आल्यातील गुणधर्म करतात. आल्यातील गुणर्म पचन व्यवस्था सुधारण्यासोबतच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळेच आपल्या भाज्यांमधे, चहामधे आलं असण्याचे गरज आहे.
Image: Google
2. हळद: हळद ही बुरशी विरोधी, संसर्ग विरोधी म्हणून काम करते. हळदीमधे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. जीवाणूविरोधी , सूज आणि दाह विरोधी घटक हळदीत असतात. त्यामुळेच हळदीचा उपयोग पचन सुधारण्यास होतो. म्हणूनच चिमूटभर हळद उठल्यानंतर खाण्याच सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. आपल्या रोजच्या आहारातून पोटात हळद कशी जाईल याचा प्रयत्न व्हायला हवा. शिवाय स्वयंपाकात हळद वापरताना त्यातील गुणधर्म कायम राहातील अशा पध्दतीनं पदार्थात हळद टाकावी असं तज्ज्ञ सांगतात . फोडणीत हळद घातल्यास हळद जळून तिच्यातील गुणधर्म नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणूनच स्वयंपाकात हळद तिच्यातील गुण शाबूत राहातील अशा हुशारीनं वापरण्याची गरज आहे.
Image: Google
3. जीरे: जीर्यामधे सूज आणि दाहविरोधी घटक असतात. जिर्यातील गुणधर्म पोटातील समस्यांवर उपयोगी ठरतात. जिर्याचं पाणी नियमित घेतल्यास पचनास मदत करणारे विकर निर्माण होण्यास मदत होते. हे विकर पचन क्रियेचा वेग वाढवतात. जिर्यातील गुणधर्म आतड्याशी संबंधित समस्यांशीही दोन हात करतात.
Image: Google
4. मेथीचे दाणे: मेथीचे दाणे पोटात गेल्यास ते शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. मेथीतील गुणधर्म पोट आणि आतड्यांना शांत ठेवण्याचं काम करतात. डॉक्टर अबरार म्हणतात की, रात्री थोडेसे मेथी दाणे पाण्यात भिजवावे. रोज सकाळी रिकाम्या पोटी हे मेथीचं पाणी पिल्यास वजन कमी होतं, पोटातील चरबीचं नैसर्गिकरित्या ज्वलन होतं. त्यामुळे कढी, आमटी, वरण करताना फोडणीत मेथीच्या दाण्यांचा समावेश आवर्जून करण्याचा सल्ला अबरार देतात.
Image: Google
5. वेलची: तीव्र स्वादाची आणि गंधाची वेलची बध्दकोष्ठता, अपचन आणि गॅस यासारख्या पचनाशी संबंधित समस्यांवर प्रभावी काम करते. या समस्या नियमित वेलची चावून खाल्ल्यास दूर होतात.