Join us   

5 लक्षणं देतात आपली रोगप्रतिकारशक्‍ती कमी झाल्याचा सिग्नल; तुम्ही ऐकताय का शरीराचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 6:41 PM

आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली की ढासळलेली हे समजून घेण्यासाठी कुठल्याही बाहेरच्या तपासण्यांची गरज नसते. आपलं शरीर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं विशिष्ट लक्षणांद्वारे सांगत असतं.

ठळक मुद्दे दिवसभर थकवा जाणवणं, उत्साह नसणं हे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं लक्षण आहे.रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास छोट्याछोट्या गोष्टींचाही तणाव जाणवतो. तसेच ताण घेण्याचं प्रमाण वाढलं की त्याचा परिणाम म्हणून रोगप्रतिकारशक्ती कमी होते. उशिरा भरणाऱ्या जखमा कमजोर रोगप्रतिकारशक्तीचं लक्षण आहे. 

संवाद हा आपल्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा घटक. कोणी आपल्याशी बोलायला नसलं, आपण एकटे असलो तरी संवाद थांबत नाही. आपण मनातल्या मनात आपल्या स्वत:शी संवाद साधत राहातो. संवादामुळे मन मोकळं होतं, ज्ञान मिळतं, असलेलं ज्ञान  इतरांपर्यंत पोहोचतं. रंजन-मनोरंजन होतं.  माहितीची देवाण घेवाण होते. जगण्यात संवाद नसता तर काय झालं असतं? आपण कसे जगलो असतो, याचा विचार देखील करवत नाही. इतका संवाद महत्त्वाचा आहे. पण म्हणून आपण संवादाकडे खरंच लक्ष देतो का? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे आपलं आपल्या शरीराकडे. आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष. शरीराच्या आत विविध क्रिया सुरु असतात. त्या जाणवतही नाही इतक्या त्या सहज होतात. पण त्यात काही अडथळा आल्यास, काही बिघाड झाल्यास त्याची कुणकूण शरीराला लागते. शरीर आपल्याला आरोग्याबाबतीत काहीतरी बिघडलंय हे सांगण्याचा प्रयत्न विशिष्ट लक्षणांद्वारे करत असतं. पण शरीर आपल्याशी साधणाऱ्या संवादाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आजारी पडतो. म्हणून तज्ज्ञ म्हणतात, की शरीर काहीतरी सांगत असतं, ते ऐकायला, समजून घ्यायला शिकलात तर निरोगी राहाण्याचा मार्ग सहज सापडतो.  आपण निरोगी आहोत, सशक्त आहोत  हे जसं आपलं शरीर सांगतं तसेच आपल्या आरोग्याचं रक्षण करणारी रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे देखील  शरीर आपल्याला सांगत असतं. याकडे जर दुर्लक्ष झालं तर आजारांपासून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकत नाही. 

Image: Google

कोरोना संसर्गापासून आपल्याला रोगप्रतिकारशक्तीची आपल्या आरोग्य राखण्यातली भूमिका किती महत्त्वाची आहे हे कळायला लागलं. विविध प्रकारच्या विषाणुंचा, घातक जिवाणुंचा संसर्ग होण्यापासून केवळ आपल्याकडील रोगप्रतिकारशक्तीच आपल्याला वाचवू शकते असं आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे लक्ष देऊन आपली  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं आपण मनावर घ्यायला हवं. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती  चांगली की ढासळलेली हे समजून घेण्यासाठी  कुठल्याही बाहेरच्या तपासण्यांची गरज नसते. आपलं शरीर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं विशिष्ट लक्षणांद्वारे सांगत असतं.  लक्षणांद्वारे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे ओळखता येतं. या लक्षणांकडे लक्ष देण्याची, ती वेळेत लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकतो. 

रोगप्रतिकारशक्ती कमी झाली.. कसं ओळखाल?

Image: Google

1. सतत थकवा वाटणं

शारीरिक किंवा बौध्दिक कष्टाचं काम केल्यानंतर शरीराला, मेंदूला थकवा येतो. थोडासा आराम केला, काही खाल्ल्यास ऊर्जा येते.   झोपेतून उठल्यानंतर सकाळी छान वाटतं. ताजंतवानं वाटतं.  पण रात्री खूप वेळ झोपूनही सकाळी आपल्याला जर थकवा वाटत असेल, उत्साह वाटत नसेल , कष्टाचं काम न करताही थकल्यासारखं वाटत असेल, उठल्यानंतरही परत झोपावसं किंवा सुस्त वाटत असल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं.  रोज व्यायाम केल्यास थकलेल्या शरीरला ऊर्जा मिळते. त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती वाढण्यावर होतो. पण व्यायाम करुनही थकवा जात नसेल, व्यायाम केल्यानंतरही थकवा जास्त वाटत असल्यास वैद्यकीयतज्ज्ञांचा सल्ला घेण्याइतपत आपली रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं.

Image: Google

2. टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला

प्रौढ व्यक्तींना वर्षातून दोनदा सर्दी पडसं होणं, खोकला होणं ही सामान्य बाब आहे असं तज्ज्ञ  म्हणतात. सर्दी  खोकला झाल्यावर त्याचा मुकाबला करण्यासाठी शरीर औषधं घेण्याआधीच सज्ज होतं. सर्दी खोकल्याशी नैसर्गिक रित्या लढण्यासाठी आवश्यक ती प्रतिपिंडं ( ॲण्टिबाॅडीज)विकसित करण्यासाठी आणि त्यांच्याशी लढण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागतात. 4-5 दिवसानंतर सर्दी खोकला औषधाशिवायही कमी व्हायला लागतो.  याचं कारण आपली रोगप्रतिकारशक्ती. पण तिच जर कमजोर असेल तर सर्दी खोकला 4-5 दिवसात आपोआप कमी न होता, तो वाढतो, आठवडा उलटून गेल्यावरही टिकून राहातो. दीर्घकाळ टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचं सांगते. 

Image: Google

3.  पोटाच्या पचनाच्या समस्या

पचनाचा थेट संबंध हा रोगप्रतिकारशक्तीशी असतो. एखाद्याचं पोट जर कायमच खराब असेल, पचनाशी निगडित समस्या जर एखाद्याला कायमच सतावत असतील तर तज्ज्ञांच्या मते अशी व्यक्ती कधीच निरोगी राहात नाही. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ऊती आपल्या आतड्यात असतात.  वारंवार जुलाब होणं, आतड्यांना सूज येणं, बध्दकोष्ठतेचा त्रास कायम जाणवणं या पोटाशी, पचनाशी निगडित समस्या आपली रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याचं सांगतात.

Image: Google

4. नेहेमीपेक्षा जास्त तणाव घेणे

रोगप्र्तिकारशक्ती कमी झालेली असल्यास छोट्याछोट्या गोष्टींचा ताण येतो, सोपी सहज कामं करताना चिडचिड होते. ताणतणाव जास्त झाल्यास , चिडचिड होत असल्यास  त्याचा परिणाम म्हणून रोगप्रतिकारशक्ती आणखी कमी होते. आपली रोगप्रतिकारशक्ती ही रक्तातील पांढऱ्या पेशी, लसिका ग्रंथी आणि शरीरातील प्रतिपिंडांवर अवलंबून असते.  मानसिक ताणतणावाचा परिणाम या तिन्ही गोष्टींवर होतो. म्हणून एरवीपेक्षा आपण जास्तच चिडचिड करतोय किंवा सततच्या तणावानं अस्वस्थ वाटत असल्यास आधी डाॅक्टरांकडे जावं. दुर्लक्ष केल्यास कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती आणखी कमकुवत होते. 

5. जखमा भरायला उशीर लागणे

काम करताना, चालताना हातापायाला छोटी जखम झाली तर ती दोन तीन दिवसात भरायला लागते, हे प्रत्येकाला कळतं. पण छोट्या जखमा भरायलाही शरीर जास्त वेळ घेत असेल तर त्याचा संबंध कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीशी असतो.  म्हणून सावध होवून डाॅक्टरांकडे जाणं हा योग्य उपाय ठरतो, 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स