Join us   

दिवसभर फ्रेश-एनर्जेटीक राहायचं, तर रोज सकाळी उठल्यावर न चुकता करा फक्त ५ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2024 3:14 PM

5 Things To Do Every Morning For Healthy Life : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्याविषयी...

आपण सकाळी उठल्यापासून घरातली कामं, स्वयंपाक, साफसफाई, घरातील सगळ्यांचे खाणे पिणे आणि मग घाईगडबडीत आवरणे अशा असंख्य गोष्टी करत राहतो. इतकेच नाही तर नंतर आपले आवरणे, ऑफीसला जाण्याची धावपळ अशा असंख्य गोष्टी करत राहतो. पण या सगळ्यात आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य याकडे पाहायला आपल्याला वेळ होतोच असे नाही. मग अनेकदा सकाळी उठल्यावरही आपल्याला फ्रेश वाटत नाही आणि संध्याकाळी तर आपण पुरते थकून गेलेलो असतो. पण रोज सकाळी झोपेतून उठल्यावर लक्षात ठेवून काही किमान गोष्टी केल्यास आपला दिवस एकदम फ्रेश आणि एनर्जेटीक जाण्यास मदत होते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्या कोणत्या पाहूया (5 Things To Do Every Morning For Healthy Life)...

१. सूर्यप्रकाशात जा

सकाळच्या वेळी आपल्याला उगवत्या सूर्याचा छान कोवळा प्रकाश मिळाला तर त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे हाडं बळकट होण्यास मदत होते. तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि मूड चांगला राहण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे सकाळी किमान १० ते १५ मिनीटे सूर्यप्रकाशात जायला हवे.

२. सकारात्मक वाक्ये म्हणा

आपण दिवस कोणत्या नोटवर सुरू करतो त्यावर आपला दिवस कसा जाणार हे अवलंबून असते. सकाळच्या वेळी सकारात्मक वाक्यांनी, विचारांनी दिवसाची सुरुवात केली तर दिवसभर ही सकारात्मकता आपल्या सोबत राहते आणि आपल्याला हवे तसेच घडते. 

३. योगासने

सकाळच्या वेळी किमान ३ आसने नियमित करायला हवीत. पवनमुक्तासनामुळे पोटात असलेला गॅस मोकळा होण्यास मदत होते. अनुलोम विलोम हा प्राणायामातील महत्त्वाचा प्रकार असून तोही अवश्य करायला हवा. आयुर्वेदातील जलनितीची सरावही तज्ज्ञांच्या सल्लायने नियमित करायला हवी.  यामुळे श्वसनसंस्था मजबूत होण्यास मदत होते. 

४. डीटॉक्स ड्रींक 

शरीर सकाळच्या वेळी डीटॉक्स करणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी तुम्ही प्लेन लिंबू पाणी, आवळा-आलं आणि हळद यांचे पाणी घेऊ शकता. यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर स्वच्छ होते. 

५. ब्रिस्क वॉक

डीटॉक्स ड्रींक घेतल्यानंतर सकाळच्या वेळी २० ते ३० मिनीटे तरी चालणे अतिशय महत्त्वाचे असते. नुसते चालण्यापेक्षा हे चालणे ब्रिस्क वॉक पद्धतीचे असेल तर त्याचा हृदयाचे कार्य, रक्तप्रवाह सुरळीत होण्यास याचा चांगला उपयोग होतो. सकाळच्या वेळी कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तर मूड चांगला राहण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलफिटनेस टिप्स