रात्रीची शांत आणि गाढ झोप हे एकप्रकारचं टॉनिक असतं. किमान ७ ते ८ तास शांत झोप झाली की आपला पुढचा दिवस चांगला जातो. पण पुरेशी झोप न झाल्याने अॅसिडीटी, डोकेदुखी अशा काही ना काही समस्या उद्भवत राहतात. अनेक दिवस झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा हृदयाच्या आणि मेंदूच्या कार्यावरही विपरीत परीणाम होत असल्याचे काही संशोधनांतून समोर आले आहे. अनेकांना कोणत्याही वेळेला, कोणत्याही ठिकाणी पडलं तरी झोप लागते (5 things to get deep sleep instantly at night) .
पण काही जणांना मात्र कित्येक तास या कुशीवरुन त्या कुशीवर होत राहिलं तरी काही केल्या झोप येत नाही. ताणतणाव, आरोग्याच्या समस्या, मोबाइल किंवा स्क्रीनचे व्यसन, कौंटुंबिक जबाबदाऱ्या ही झोप पूर्ण न होण्यामागची काही महत्त्वाची कारणे असतात. पण झोप पूर्ण न होणे अनेक समस्यांचे महत्त्वाचे कारण असते. त्यामुळेच पडल्या पडल्या झोप आली तर त्यासारखे दुसरे सुख नाही.पाहूयात अशी लगेच झोप येण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत...
१. झोपेची वेळ नक्की करा
रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ नक्की असायला हवी. त्यामुळे मेंदूला एकप्रकारची वेळच्या वेळी झोपण्याची सवय लागते. रात्री वेळेत झोपले तर सकाळी जागही वेळेत जाग येते. वेळ सेट केल्याने शरीराचे घड्याळ चांगले सेट होते आणि झोप पूर्ण होण्यास याची मदत होते.
२. रुमचे वातावरण
आपण ज्या रुममध्ये झोपणार आहोत त्या रुममधले वातावरण छान असेल तर आपल्याला पटकन झोप यायला मदत होते. रुममध्ये लवेंडर ऑईल किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मंद सुवास येईल अशी सोय केल्यास त्याच्या मंद सुवासाने झोप लागण्यास मदत होते. अशाप्रकारच्या वासाने मेंदूतील मेलाटोनिनची लेव्हल वाढण्यास मदत होते आणि झोप लागण्याची शक्यता वाढते.
३. चही-कॉफीच्या वेळा
बरेचदा आपण संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर किंवा कोणाला भेटल्यावर अगदी सहज चहा किंवा कॉफी घेतो. पण या दोन्हीमध्ये असणारे घटक झोपेसाठी घातक असतात. त्यामुळे दुपारी साधारण ३ ते ४ नंतर चहा किंवा कॉफी अजिबात घ्यायला नको. त्यामुळे रात्री गाढ झोप लागण्यास मदत होईल.
४. स्क्रीन
आजकाल रात्रीच्या वेळी बरेच जण ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज, शोज असे काही ना काही पाहतात. त्याशिवाय सोशल मीडियावर रिल्स पाहण्यात किंवा आणखी काही करण्यातही बराच वेळ जातो. यामुळेही झोप लागण्यास उशीर होतो. त्यामुळे झोपण्याआधी किमान १ ते २ तास फोन दूर ठेवायला हवा.
५. खोलीचे तापमान
झोप येण्यासाठी आपल्या खोलीचे तापमान आणि ती हवेशीर असणे आवश्यक असते. खोली सगळ्या बाजूने बंद केली तर मोकळी हवा आत येत नाही आणि गुदमरल्यासारखे वाटते. तसेच प्रमाणापेक्षा जास्त गरम होत असेल तरी झोप येत नाही. त्यामुळे झोप येण्यासाठी खोली नेहमीपेक्षा थोडी गार असायला हवी.