महाशिवरात्री हा वर्षातील एक मोठा सण, शंकराची आराधना करण्यासाठी या दिवशी शिवभक्त उपवास करतात. उपवास म्हणजे पोटाला आराम देणे, नेहमीपेक्षा कमी खाणे असा त्याचा अर्थ असला तरी आपल्याकडे मात्र उपवासाच्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त खाल्ले जाते. म्हणूनच एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हटले जाते. महाशिवरात्री म्हणजे थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याचा काळ या काळात आपले शरीर हवामानातील बदलाशी जमवून घेत असताना उपवासाच्या नावाखाली आपण पोटाला ताण दिला तर त्याचे आरोग्यावर चुकीचे परिणाम दिसून येतात. पाहूयात उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
१. उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करु नये. अनेक जण निर्जल किंवा काहीही न खाता पिता उपवास करतात. काही जण या दिवशी केवळ फलाहार घेतात. पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे ना याचा अंदाज घेऊन मगच उपवास करायला हवा.
२. ज्यांना डायबिटीस, हृदयरोग, रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीचा योग्य पद्धतीने विचार करुन मगच उपवास करावा. तब्येतीला झेपणारे नसेल तर उपवासाचा अट्टाहास नको.
३. उपवास म्हणजे साधारणपणे साबुदाणा, बटाटा, दाणे असे वातूळ पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. पण या पदार्थांमुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. वातूळ पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास शरीरातील चरबी तर वाढतेच. पण या पदार्थांमुळे पित्तही खवळू शकते. त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी उपवास करताना योग्य तो विचार करायला हवा.
४. उपवासाच्या दिवशी इतर पदार्थांबरोबरच आहारात दूध, ताक, सरबत, शहाळं पाणी, उसाचा रस, लस्सी अशा द्रव पदार्थांचाही समावेश करायला हवा. त्यामुळे शरीरातील द्रवाची पातळी चांगली राहून एनर्जी टिकण्यास मदत होते.
५. याबरोबरच तेटकट चिप्स, वेफर्स अशा गोष्टी प्रमाणात खाव्यात. त्याऐवजी खजूर, राजगिऱ्याचे लाडू, सुकामेवा हे खायला हवे. याबरोबरच काकडी, रसदार फळे यांचा आहारात समावेश वाढवायला हवा. म्हणजे उपवासाचा त्रास न होता उपवासाचा दिवस सगळ्या अर्थाने चांगला होईल.