साखर हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक असतो. चहा-कॉफी, गोड पदार्थ किंवा कोणतेही पॅकेट फूड, बेकरी प्रॉडक्ट यांमध्ये साखर असतेच असते. पण ही साखर आरोग्यासाठी अतिशय घातक असते. आपल्याला हे माहित असूनही आपल्याला साखर खाणं मात्र काही केल्या कंट्रोल होत नाही. पण एकदा साखरेवर नियंत्रण मिळवून पाहिलं तर आरोग्याच्या बऱ्याच समस्या आपल्यापासून नक्कीच दूर राहण्यास मदत होऊ शकते (5 things you will experience once you Quit Sugar).
साखर ही फक्त शुगर असणाऱ्यांनी किंवा लठ्ठपणाची समस्या असणाऱ्यांनी नियंत्रणात ठेवायला हवी असा आपला समज असतो. पण ज्यांना शुगर किंवा अन्य कोणत्याही समस्या नाहीत त्यांनीही आरोग्य उत्तम राहण्यासाठी साखरेवर नियंत्रण ठेवायला हवे. त्याचा आरोग्याला कशाप्रकारे फायदा होतो याविषयी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. पाहूया साखर सोडण्याचे शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे ...
१. तुम्हाला शरीरात सतत खूप ऊर्जा असल्यासारखे वाटेल. कारण आहारात साखर नसल्याने रक्तातील साखरेच्या प्रमाणात खूप जास्त चढउतार होणार नाहीत.
२. नकळत तुम्हाला वजन कमी झाल्यासारखे वाटेल कारण साखर आपण ब्रेकफास्ट, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण यात जास्त प्रमाणात खात नाही. तर मधल्या वेळच्या खाण्यामध्ये किंवा स्नॅक्समध्ये आपण गोड पदार्थांचा समावेश करतो. पण हे मधल्या वेळचे गोड खाणे बंद झाल्याने नकळत वजन कमी होण्यावर त्याचा परीणाम होईल.
३. सकाळी उठल्यावर तुम्हाला नकळत खूप फ्रेश वाटण्यास मदत होईल. शरीरातील निओपेप्टाईड शुगरमुळे वाढते आणि त्यामुळे आपल्याला एकप्रकारचा थकवा किंवा आळस येतो. पण साखर बंद केली तर हा घटक वाढणार नाही आणि फ्रेश वाटण्यास मदत होईल.
४. याच घटकाचे प्रमाण कमी झाल्याने झोपेवरही त्याचा चांगला परीणाम होईल. लवकर आणि चांगली गाढ झोप लागण्यास मदत होईल. लहान मूल ज्याप्रमाणे एकदम गाढ झोपते तितकी गाढ झोप आल्याने झोप पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल.
५. साखर न खाल्ल्याचा आणखी एक महत्त्वाचा परीणाम म्हणजे सौंदर्यात भर पडेल. त्वचा चमकदार आणि नितळ होण्यास साखर न खाण्याचा चांगला फायदा होईल.