Join us   

दात किडतील म्हणून गोड खात नाही? ५ उपाय, दातही किडणार नाहीत, गोडही प्रमाणात खाता येईल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 5:05 PM

5 Ways to Protect Teeth if you are Eating Sweets : सणावाराच्या दिवसांत किंवा एरवीही गोड खाल्ल्यास आवर्जून करायला हव्यात अशा ५ गोष्टी कोणत्या ते पाहूया...

ठळक मुद्दे कडक असलेले गोड पदार्थ, बराच काळ तयार करुन ठेवलेली मिठाई, चिकट गोड पदार्थ यांसारख्या गोष्टी टाळलेल्या केव्हाही चांगल्यासाखर नसलेले च्युइंगम मिळते ते खाल्ल्यास दात स्वच्छ राहण्यास मदत होते. 

गोड पदार्थ हा अनेकांसाठी वीक पॉईंट असतो. पण डायबिटीसमुळे, लठ्ठपणामुळे किंवा कधी दातांना किडतील म्हणून अनेक जण गोड खाणं टाळतात. गोडामुळे आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी निर्माण होत असल्याने गोड खाऊ नका असा सल्ला अनेकांना दिला जातो. मात्र जेवणात किंवा जेवणानंतर, मधल्या वेळेला थोडे तरी तोंडात टाकायला गोड काहीतरी हवेच असते. गोड खाल्ले आणि दात वेळच्या वेळी स्वच्छ केले गेले नाहीत तर मात्र दात किडण्याची शक्यता असते. एकदा दात किडले की त्याचे दुखणे सहन न होणारे असते. दातांची किड वेळीच काढली नाही तर क्लीन अप, रुट कॅनाल, कॅप बसवणे किंवा दात जास्तच खराब झाला असेल तर तो काढून टाकणे अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. यासाठी येणारा खर्चही खूप जास्त असतो. त्यामुळे सणावाराच्या दिवसांत किंवा एरवीही गोड खाल्ल्यास आवर्जून करायला हव्यात अशा ५ गोष्टी कोणत्या ते पाहूया (5 Ways to Protect Teeth if you are Eating Sweets)...

(Image : Google)

१. चांगला टूथब्रश निवडा 

अनेकदा आपण टूथब्रश खरेदी करताना म्हणावे तितके लक्ष देत नाही. मात्र त्याचा परिणाम दात किडण्यावर होतो. त्यामुळे टूथब्रश खरेदी करताना चांगल्या प्रतीचा, योग्य आकाराच टूथब्रश खरेदी करा. यामध्ये तुम्ही इलेक्र्टीक टूथब्रशचाही विचार करु शकता.     

२. फ्लॉसिंग 

दातांचे फ्लॉसिंग करणे अतिशय आवश्यक असते. यामुळे दाताच्या कोपऱ्यांमध्ये अडकलेले गोड पदार्थांचे कण निघण्यास मदत होते. बाजारात विविध प्रकारची फ्लॉसिंग उपकरणे उपलब्ध असतात, त्यांचा अवश्य वापर करावा. 

३. चुळा भरा

अनेकदा ऑफीसमध्ये किंवा घरातही आपण काही खाल्ले की चुळा भरण्याचा आपण कंटाळा करतो. मात्र असा कंटाळा करणे योग्य नाही, त्यामुळे दात किडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक वेळी खाल्ल्यानंतर न विसरता भरपूर चुळा भरा. 

(Image : Google)

४. शुगर फ्री च्युइंगम खा

च्युइंगम म्हणजे काहीतरी अतिशय वाईट असा आपला समज असतो. पण च्युइंगम दातांच्या स्वच्छतेसाठी अतिशय उपयुक्त असते. यामध्येही साखर नसलेले च्युइंगम मिळते ते खाल्ल्यास दात स्वच्छ राहण्यास मदत होते. 

५. प्रत्येक गोड पदार्थ चांगला नाही 

गोड आवडते म्हणून कोणतेही गोड पदार्थ कितीही प्रमाणात खाणे योग्य नाही. कडक असलेले गोड पदार्थ, बराच काळ तयार करुन ठेवलेली मिठाई, चिकट गोड पदार्थ यांसारख्या गोष्टी दातांच्या आरोग्यासाठी चांगल्या नसल्याने त्या शक्यतो टाळायला हव्यात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलदातांची काळजी