Join us   

बदाम जास्त खाण्याचे 6 तोटे, आवडतात आणि पौष्टिक म्हणून किती आणि कसा खाल सुकामेवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 3:40 PM

बदाम जर प्रमाणात खाल्ले (almond for health) तर वजन कमी होण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यापर्यंत अनेक फायदे होतात. पण प्रमाणापेक्षा जास्त बदाम खाल्ले (effects of eating almond too much) तर मात्र आरोग्यास अपाय होतातच!

ठळक मुद्दे दिवसभरात 5 ते 6 बदाम खाणं हे प्रमाण योग्य मानलं जातं.बदामामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. फायबरयुक्त आहार जास्त घेतला तर त्याचा आरोग्यास तोटा होतो.  चवीला कडवट असलेले बदाम खाल्ल्यास साइनाइड हे विषाक्त घटक तयार होण्याची शक्यता असते. 

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी बदाम(almond for health)  हे पौष्टिक असतात. पण पौष्टिक आहेत म्हणून कितीही बदाम खाल्ले तर त्याचे दुष्परिणाम होतात. बदाम जर प्रमाणात खाल्ले तर (effects of eating almonds too much)  वजन कमी होण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यापर्यंत अनेक फायदे होतात. पण प्रमाणापेक्षा जास्त बदाम खाल्ले तर मात्र आरोग्यास अपाय होतातच!

Image: Google

बदाम जास्त खाल्ल्यास

1. 28 ग्रॅम बदाममध्ये 164  उष्मांक असतात. नियमित आहारासोबत जर बदाम जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन वाढतं. तज्ज्ञ सांगतात की दिवसभरात 5 ते 6 बदाम खाणं हे प्रमाण योग्य मानलं जातं. 

2. बदामामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. फायबरयुक्त आहार जास्त घेतला तर शरीराची आहारातल्या पोषण घटकांचं शोषण करण्याची क्षमता कमी होते. बदमातील पोषक घटकांचा लाभ शरीरास होण्यासाठी बदाम हे संध्याकाळच्या स्नॅक्स आणि रात्रीच्या जेवणादरम्यान प्रमाणात खायला हवेत. 

Image: Google

3. 20 ते 22 बदामामध्ये 3.5 ग्रॅम फायबर असतं. फायबरयुक्त आहार हा आरोग्यासाठी फायदेशीरच असतो मात्र प्रमाणापेक्षा जास्त फायबर पोटात गेल्यास बध्दकोष्ठतेची समस्या निर्माण होते. आतड्यांच्या समस्या निर्माण होतात. फायबरयुक्त आहार घेऊन त्यावर जास्त पाणी प्याल्यास त्याचा परिणाम पचनावर होतो. म्हणूनच बदाम जर जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटावर सूज येणं, गॅसेस होणं, पोटात चमका येणं यासारख्या पोटाशी आणि पचनाशी निगडित समस्या निर्माण होतात. 

4. बदामामध्ये विरघळणारे ऑक्सालेट भरपूर प्रमाणात असतात. शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सालेट झाल्यास मूतखड्याचा त्रास होण्याची शक्यता असते. 100 ग्रॅम भाजलेल्या बदामामध्ये 469 मिलीग्रॅम ऑक्सालेट असतात. मूतखड्याचा धोका टाळण्यासाठी बदाम हे नियंत्रित प्रमाणात सेवन करायला हवेत. 

Image : Google

5. बदाम, शेंगदाणे खाल्ल्याने अनेकांना ॲलर्जी होण्याची शक्यता असते. ज्यांना अशा प्रकारच्या ॲलर्जींचा त्रास असतो त्यांनी बदाम हे जपूनच खायला हवेत. कोणाला बदाम खाल्ल्याने ओरल ॲलर्जी सिंड्रोम ही समस्या असते. त्यांना बदाम खाल्ल्यानं तोंडात खाज, घसा खवखवणं, ओठ सूजणं असे त्रास होवू शकतात. 

6. बदामात विशेषत: चवीला कडवट बदामामध्ये साइनाइड हे विषाक्त घटक निर्माण होण्याची शक्यता असते. गोडसर बदामांच्या तुलनेत कडवट बदामात हायड्रोसायनिक ॲसिडचं प्रमाण 40 पट अधिक असतं.  शरीरात जर हायड्रोसायनिक ॲसिडचं प्रमाण वाढ्दलं तर श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे चवीनं कडवट बदाम खाण्याचे टाळून गोडसर बदाम प्रमाणात सेवन करावेत. तज्ज्ञांच्या मते बदामातील पोषक घटकांचा फायदा शरीरास होण्यासाठी दिवसभरात 5 ते 8 बदाम सेवन करायला हवेत. 

  

टॅग्स : अन्नआरोग्यआहार योजना