Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात येणाऱ्या हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ६ सोपे उपाय, उन्हाळा होईल सुसह्य...

उन्हाळ्यात येणाऱ्या हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ६ सोपे उपाय, उन्हाळा होईल सुसह्य...

Protect Yourself From The Dangers of Extreme Heat Stroke : हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 09:44 AM2023-04-14T09:44:20+5:302023-04-14T09:44:20+5:30

Protect Yourself From The Dangers of Extreme Heat Stroke : हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असत.

6 things to keep in mind to protect yourself from the heat stroke | उन्हाळ्यात येणाऱ्या हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ६ सोपे उपाय, उन्हाळा होईल सुसह्य...

उन्हाळ्यात येणाऱ्या हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ६ सोपे उपाय, उन्हाळा होईल सुसह्य...

सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरु झाला आहे. सगळीकडेच वातावरण गरम आणि उष्ण आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत जात आहे. या काळात वातावरणात उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे अंगाची लाही लाही लाही होते. अशावेळी घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसते. हा उन्हाळा येताना सोबत वेगवेगळ्या प्रकारचे आजार व शारीरिक समस्याही घेऊन येतो. वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला डोकेदुखी, थकवा, डिहायड्रेशन, हिट स्ट्रोक, त्वचेसंबंधित विविध आजार अशा असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. 

पावसाळा सुरू होईपर्यंत रणरणत्या उन्हाने जीव हैराण होणं स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगातून प्रचंड घाम येतो. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. कारण घामाद्वारे शरीरातील पाण्यासोबत आवश्यक क्षार आणि मिनरल्सदेखील कमी होतात. डिहायड्रेशनमुळे हिट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असत(6 Things To Keep In Mind To Protect Yourself From The Heat Stroke).

 हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नेमके उपाय काय आहेत? 

१. भर उन्हांत घराबाहेर पडू नका :- उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हात घराबाहेर पडल्यामुळे तुम्हाला डिहाड्रेशनचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात सुर्याच्या प्रखरतेमुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार नष्ट होतात. उन्हाळ्यांत आपल्याला सतत येणारा घाम यामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावते. यासाठी अशावेळी घराबाहेर न पडणे हेच उत्तम. शिवाय जर काही कारणांसाठी दुपारी घराबाहेर जावं लागणार असेल तर छत्री, स्कार्फ, गॉगल आणि पाण्याची बाटली सोबत जरूर ठेवा.

२. आरामदायक कपडे घालावे :- उन्हाळ्यात नेहमी सैलसर आणि सुती कपडे वापरावे. ज्यामुळे शरीराला पुरेशी हवा मिळू शकते. मात्र उन्हाळ्यात जर घट्ट आणि तंग कपडे घातले तर शरीरातील हवा खेळती राहत नाही. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळत नाही आणि यामुळे अंगावर खूप घाम येऊन घामोळ्या येऊ शकतात. 

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात ३ सोपे उपाय, लाही लाही होईल कमी...

३. दिवसातून दोनदा अंघोळ करावी :- उन्हाळाच्या दिवसांत किमान दोन वेळा अंघोळ करावी. दिवसातून किमान दोन वेळा अंघोळ केल्यास शरीराला थंडावा मिळू शकतो. कोमट पाणी तुमच्या शरीराचे तापमान कमी करते, घाम येणे कमी करते, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. म्हणून उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. 

४. तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा :- अती तेलकट, मसालेदार पदार्थ पचनास जड असतात. या पदार्थांमुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो. ज्यामुळे तुम्हाला पित्त आणि अपचनाचा त्रास होतो. तसेच तुमच्या शरीरातील तापमान बदलते. यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होते. यासाठी उन्हाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळून पचनास हलका आहार घ्यावा. 

५.  भरपूर पाणी प्यावे :- आपल्या शरीराला मुबलक पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी, क्षार आणि मिनरल्स बाहेर निघून जातात. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी जास्त होत असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसभरात मुबलक पाणी पिणं आवश्यक आहे. धोका टाळण्यासाठी उन्हाळ्यात दर अर्धा तासाने एक ते दोन घोट पाणी सतत पीत राहिले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहील. याचबरोबर घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवण्यास विसरू नका.

६. धुम्रपान आणि मद्यपान टाळा :- मद्यपान आणि धुम्रपान केल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आपल्याला वारंवार डिहायड्रेशन होऊ शकते. डिहायड्रेशन आणि व्यसनयामुळे तुमच्या मुत्राशयावर ताण येऊ शकतो. ज्यामुळे किडनीचे विकार होण्याचा धोका वाढतो. यासाठी उन्हाळ्यांत व्यसनांपासून दूर राहणेच सर्वोत्तम उपाय आहे.

Web Title: 6 things to keep in mind to protect yourself from the heat stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.