Join us   

झोपण्यापूर्वी पायाला तेल लावून मसाज करण्याचे 7 फायदे, करा पायांचे लाड-तब्येत छान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 4:41 PM

थोडे आपल्या पायांचेही लाड करा; झोपण्यापूर्वी पायाला तेल लावून मसाज करण्याचे 7 फायदे

ठळक मुद्दे रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल कोमट करुन पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासही फायदे होतात.

आपले पाय दिवसभर चालणं, उभं राहाणं, हालचाल करणं, आपलं वजन पेलत आपला दिवस गतिशील ठेवण्याचं महत्वाचं काम करतात. पण तरीही पायाकडे आपलं विशेष लक्ष नसतं. नाही दिवसभर पण निदान रात्रीतरी पायांकडे थोडं लक्ष पुरवायला हवं. पण म्हणजे नेमकं काय करायला हवं? फार काही नाही फक्त झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना 5-10 मिनिटं तेलानं मालिश करावी. पायांच्या तळव्यांना तेल चोळणं हा उपाय केवळ थंडीत शरीर गरम राखण्यासाठी करतात हा गैरसमज आहे. उन्हाळ्यातल्या रात्रीही पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज आवश्यक असतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल कोमट करुन पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासही फायदे होतात.

Image: Google 

पायांच्या तळव्यांना रोज मसाज का गरजेचा?

1.बैठ्या जीवनशैलीमुळे पायांच्या स्नायुंची पुरेशी हालचाल होत नाही. दिवसभर पायात घट्ट बूट, सॅण्डल घातल्याने, उंच टाचेची पादत्राणे वापरल्यानं पायाकडील रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पायांचे  स्नायू दुखावतात. पाय, पोटऱ्या, घोटे , टाचा दुखतात. यावर उपाय म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलानं किमान दहा मिनिटं पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास पायाकडील रक्तप्रवाह सुधारतो. संपूर्ण शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. निरोगा आरोग्यासाठी रोज रात्री पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज करणं आवश्यक आहे. 

2. दिवसभर बसून, उभं राहूण, चालून शरीर थकतं, शरीराच्या विविध स्नायुंवर ताण येतो. पायही सूजतात. हा थकवा,  ताण घालवण्यासाठी, पायाला आलेली सूज कमी करण्यासाठी पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज करावा. 

3. रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. दिवसभराचा थकवा निघून जाऊन रात्री शांत झोप येते. शांत झोपेसाठी पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज आवश्यक आहे. 

4. शरीर दुखत असल्यास, एखाद्या अवयवाचे स्नायू दुखत असल्यास पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज करावा. पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज केल्यास मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, मायग्रेन या वेदनांवर आराम मिळतो.

5. दिवसभर मूड चांगला राहाण्यासाठी, औदासिन्याची ( डिप्रेशनची) लक्षणं कमी करण्यासाठी रात्री पायाच्या तळव्यांना 4-5 मिनिटं तेलाचा मसाज करावा असं तज्ज्ञ सांगतात. 

Image: Google

6. पायाचं आरोग्य जपण्यासाठी तळव्यांना मसाज फायदेशीर ठरतो. पायाकडील स्नायु उत्तेजित होतात. आखडलेले पायाचे स्नायू मोकळे होतात.  घोट्याकडील, तळव्याकडील वेदना कमी होतात.  घोटे अधिक लवचिक होतात. तळव्यांना मसाज केल्यानं पायाच्या दुखण्यावर आराम मिळतो.

7. गरोदरपणात द्राव साठून राहिल्यानं पावलं, घोटे, पाय सूजतात. हा त्रास नियमितपणे पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज केल्यानं कमी होतो.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी