Join us   

रोज वेळच्या वेळी पोट साफच होत नाही? ७ सोपे उपाय; पोट होईल झटपट साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2023 8:10 AM

7 Effective Home Remedies for Constipation Problem : बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यासाठी करा घरच्या घरी सोपे उपाय...

रोजच्या रोज वेळच्या वेळी पोट साफ होणं हे उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपण लहान मुलांनाही लहानपणापासूनच सकाळी टॉयलेटला जाण्याची सवय लावतो. पोट साफ असेल तर आपल्या आरोग्याच्या बहुतांश तक्रारी दूर होतात. पण कधी पुरेसे पाणी न प्यायल्याने किंवा आहारात फायबर्सचे प्रमाण कमी असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. काहीवेळा सततच्या बैठ्या कामानेही बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. पोट साफ झाले नाही की करपट ढेकर येणे, पोट जड झाल्यासारखे वाटणे, भूक न लागणे अशा समस्या निर्माण होतात. असे होऊ नये आणि वेळच्या वेळी पोट साफ व्हावे यासाठी आयुर्वेदात काही सोपे उपाय सांगितले आहेत. ही औषधे घेतल्यास पोट साफ होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. ही औषधे कोणती आणि ती कशी घ्यायची याविषयी (7 Effective Home Remedies for Constipation Problem)...

१. त्रिफळा चूर्ण

यामध्ये आवळा, हरीतकी आणि बेहडा अशा तीन गोष्टींचे मिश्रण असल्याने याला त्रिफळा असे म्हटले जाते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण घेतल्यास सकाळी पोट साफ होण्यात अडचणी येत नाहीत. 

२. इसबगोल

काहीसे विचित्र नाव वाटले तरी हे पोट साफ होण्यास अतिशय फायदेशीर असते. प्सिलियम हस्कच्या बियांचे हे चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत घ्यायला हवे. 

(Image : Google)

३. अश्वगंधा 

पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अश्वगंधा अतिशय उपयुक्त असते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घ्यायला हवे. बद्धकोष्ठतेसाठी अश्वगंधा घेतल्यास निश्चितच फायदा होतो. 

४. तूप

तूप हे शरीरात वंगण म्हणून काम करते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रात्री झोपताना नियमितपणे १ चमचा तूप खाऊन त्यासोबत कोमट पाणी प्यायला हवे. यामुळे कोठा हलका होऊन पोट साफ होण्यास मदत होते. 

५. पपई 

पपई हे पोट साफ होण्यासाठी अतिशय उपयुक्त असे फळ आहे. यामध्ये पेपेन नावाचे एक एन्झाईम असते ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पपई हा पोटाच्या बहुतांश समस्यांसाठी एक अतिशय उत्तम उपाय आहे. 

६. फळं आणि हिरव्या पालेभाज्या 

फळं आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पालेभाज्या आणि फळांमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असल्याने पोट चांगल्या पद्धतीने साफ होते.

७. पाणी आणि व्यायाम

पाणी पिणे आणि नियमित व्यायाम करणे पोट साफ होण्यासाठीचा अतिशय चांगला उपाय आहे. पाणी प्यायल्याने पोट साफ होते तसेच व्यायामामुळेही स्नायूंची हालचाल होते आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल