आपण जो आहार घेतो त्याचे काही नियम पाळले तर आपल्याला खात असलेल्या अन्नाचा पुरेपूर फायदा होतो. ठराविक गोष्टी ठराविक वेळेला खाल्ल्या तरच त्यातून पूर्ण पोषण मिळण्यास मदत होते. अन्यथा या खाण्यामुळे आरोग्याला त्रास होण्याचीच शक्यता अधिक असते. यासाठी आहाराचे काही नियम आवर्जून पाळायला हवेत. दिवसा थोडे जड पदार्थ खाल्लेले चालतात कारण दिवसभराच्या हालचालीमुळे ते पचण्यास मदत होते. पण रात्रीच्या वेळी जड पदार्थ खाणे शक्यतो टाळायला हवे. कारण रात्री खाल्लेल्या अन्नाचे पुरेसे पचन होत नसल्याने ते पोटात साठून राहते आणि पोट जड जड वाटते. फळं ही विशेषत: गोड असल्याने आणि पचायला जड असल्याने सूर्यास्ताच्या आधी खावीत. सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी तर फळं अजिबात खाऊ नयेत. रात्री पोटाला कोणती फळं जड पडतात याविषयी (7 Fruits that should not be Consumed at Night)...
१. केळी
केळे पचायला जड असते आणि त्यात कॅलरीजही खूप जास्त असतात. केळं खाल्ल्यावर लवकर झोप येत नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी केळं अजिबात खाऊ नये.
२. डाळींब
डाळींब आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त फळ असले तरी रात्रीच्या वेळी डाळींब खाल्ल्याने अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यामुळे पचनक्रियेत अडथळे येत असल्याने झोपायच्या आधी डाळींब खाणे टाळावे.
३. अंजीर
अंजीर उष्ण प्रकृतीचे असतात तसेच अंजीर खाल्ल्याने गॅसेसचाही त्रास होण्याची शक्यता असल्याने रात्री अंजीर अजिबात खाऊ नयेत.
४. द्राक्षं आणि संत्री
द्राक्षं आणि संत्री गोड असल्याने त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. ही फळे रात्री खाल्ल्याने अॅसिडीटी आणि जळजळ होण्याची शक्यता असल्याने ही अॅसिडीक फळं रात्रीची खाणे योग्य नाही.
५. पेरु
हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्यामुळे अॅसिडीटी होण्याची समस्या असतेच. पेरुमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने तो खाल्ल्याने पोट जड होते.
६. चेरी
चेरीमध्ये मेलाटोनिन हा घटक असतो, जो खाल्ल्याने झोप जाण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री चेरी खाल्ल्यास झोप उडण्याची शक्यता असल्याने हे फळ रात्रीच्या वेळी खाऊ नये.
७. अननस
अननस हे आंबट फळ असल्याने यामध्ये सायट्रीक घटक असतात. त्यामुळे अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच अननस पचायला बराच वेळ लागत असल्याने रात्री झोपायच्या वेळी शक्यतो हे फळ खाणे टाळावे.