अॅसिडीटीने बरेच जणांना त्रास होत असल्याचं आपण कायमच पाहतो. कधी अॅसिडीटी झाल्याने डोकं जड होतं तर कधी मळमळ होऊन उलट्यांसारखं होतं. अॅसिडीटी हे अपचनाचे एक महत्त्वाचे लक्षण असून आपण खात असलेले अन्न योग्य पद्धतीने न पचल्याने शरीरात एक प्रकारचे अॅसिड निर्माण होते आणि ते आपल्याला त्रास देते. आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यसने, अपुरी झोप, खाण्याच्या वेळा यांसारख्या जीवनशैलीतील चुकीच्या गोष्टींमुळे अॅसिडीटीची समस्या उद्भवते. गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता आणि अॅसिडीटी या सगळ्या पचनाशी निगडीत तक्रारी आहेत. आता या तक्रारी उद्भवण्यामागे नेमकी काय कारणं आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन आपण त्यावर योग्य ते उपाय करु शकतो (7 Reasons behind acidity problem).
१. जेवण स्कीप करणे किंवा वेळेवर न जेवणे हे अॅसिडीटी होण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. आपल्या शरीराला ठराविक वेळेला अन्न मिळण्याची सवय असते. त्या वेळेला अन्न मिळाले नाही तर शरीरात विविध प्रकारची आम्लनिर्मिती होते.
२. भूक ताणून ठेवणे आणि मग भूक लागली म्हणून एकावेळी खूप जास्त प्रमाणात जेवणे. तसेच खूप जास्त वेगाने खाण्यानेही अन्न नीट चावले जात नाही, पचत नाही आणि त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
३. अनेकांना जेवण झाल्यावर लगेच झोपण्याची सवय असते. पण त्यामुळे अन्नपचन होत नाही आणि अॅसिडीटी होऊ शकते. त्यामुळे जेवण झाल्यावर काही वेळ शतपावली करणे, वज्रासनात बसणे आवश्यक आहे.
४. बरेचदा रात्री स्क्रीनसमोर बसणे किंवा मित्रमंडळींसोबत वेळ घालवणे असे करताना तोंडात टाकायचे म्हणून काही ना काही खाल्ले जाते. पण असे तोंडात टाकणे योग्य नाही, हे अॅसिडीटीचे १ महत्त्वाचे कारण ठरु शकते.
५. दारु आणि तंबाखूचे व्यसन ही अॅसिडीटीला कारणीभूत असणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे.
६. ताणतणावांमुळे मानसिक आणि शारीरिक व्याधी मागे लागतात. प्रमाणापेक्षा जास्त ताण असेल तर पचनाच्या समस्या उद्भवतात.
७. सतत मसालेदार पदार्थ, प्रोसेस केलेले अन्नपदार्थ आणि तेलकट पदार्थ खाण्यानेही अॅसिडीटीचा त्रास उद्भवू शकतो.