मोबाइल फोन हा आपल्यापैकी अनेकांचा ताईत झाला आहे. २ मिनीट आपल्या हातात फोन नसेल तर आपल्याला चुकल्या चुकल्यासारखे होते. आपण दिवसभरातील जितका वेळ जागे असतो तेवढा जवळपास सगळा वेळ आपल्या हातात मोबाइल असतोच. कधी कामाच्या निमित्ताने आपल्याला बराच वेळ मोबाइल वापरावा लागतो. तर कधी सोशल मीडियावर सर्फींग करण्यासाठी, नाहीतर मनोरंजन म्हणून वेबसिरीज किंवा अन्य काही पाहण्यासाठी आपण बराचसा वेळ मोबाइलला चिकटलेले असतो. कित्येक जणांना गाडी चालवताना, जेवताना किंवा अगदी कोणतेही काम करताना सतत हातात मोबाइल लागतो (7 reasons why you should not carry your phone in toilet).
अनेकांना या मोबाईलचे इतके वेड असते की आंघोळीला किंवा टॉयलेटला जातानाही ते फोनशिवाय राहू शकत नाहीत. टॉयलेटमध्ये बसून कंटाळा येतो, त्यावेळात एखादी वेबसिरीज पाहून होते म्हणून एनेक जण टॉयलेटमध्ये मोबाइल घेऊन जातात. मात्र असे करणे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. मोबाइलचे इतके वेड असणे हे मानसिक अनोरोग्याचे लक्षण आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. मोबाईल टॉयलेटमध्ये नेल्याने आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवू शकतात, त्या कोणत्या पाहूया...
१. टॉयलेटमध्ये असणारे सालमोनेला, इ कोली आणि सी या जंतूंशी फोनचा संपर्क होतो जो आरोग्यासाठी घातक असतो. यामुळे आपल्याला विविध प्रकारची इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते.
२. हातात फोन असल्याने गरज नसताना आपण बराच वेळ टॉयलेटमध्ये बसून राहतो. यामुळे आपल्या खालच्या भागावर ताण पडतो आणि यामुळे हेमोरीडसचा त्रास होण्याची शक्यता असते.
३. जास्त वेळ बसल्याने खालच्या भागाला ताण पडतो आणि जठर व आतड्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात.
४. अशाने तुम्हाला फोनपासून अजिबात विश्रांती मिळत नाही आणि डोक्याला शांती मिळण्याच्यादृष्टीने हे अजिबात चांगले नसते.
५. टॉयलेटमध्ये फोन घेऊन गेल्याने तुम्ही बराच वेळ वाया घालवता आणि यामुळे तुमचा दिवसभरातील बराच वेळ वाया जातो.
६. अशाप्रकारे फोन टॉयलेटमध्ये नेणे म्हणजे तुम्ही त्याच्या जास्त प्रमाणात आहारी गेलेले असता. कोणताही मेसेज आणि नोटीफिकेशन मिस व्हायला नको असल्याने तुम्ही फोन आत घेऊन जाता, जे धोक्याचे आहे.
७. बरेचदा टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणाऱ्यांकडून फोन टॉयलेटमध्ये पडतो, याठिकाणी असणारे जंतू फोनला चिकटतात आणि ते बराच वेळ तसेच राहतात.