Join us   

दिवसभर कम्प्यूटरवर काम- हातात मोबाइल, स्क्रीन पाहून डोळे ‌थकले? ८ सोपे व्यायाम-डाेळ्यांचा ताण करा कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 4:25 PM

8 Simple Eye Exercises To Keep Your Eyes Healthy : Simple Computer Eye Exercises to Reduce Eye Strain : How to reduce computer eye strain 8 exercises for relief : दिवसातील सर्वात जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवता, मग हे डोळ्यांचे व्यायाम नक्की कराच, डोळ्यांच्या समस्या होतील गायब...

सध्या डिजिटल युग सुरु आहे, प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने स्क्रीनचा उपयोग करत असतात. कित्येकांना लॅपटॉप किंवा मोबाईल फोन शिवाय करमतच नाही. काहीवेळा कामानिमित्त आपण सगळेच दिवसरात्र कोणत्या ना कोणत्या स्क्रीनसमोर बसलेले असतोच. सतत डोळ्यांसमोर अशी स्क्रीन दिसत राहिली तर एका ठराविक काळानंतर आपल्याला डोळ्यांच्या अनेक समस्या सतावू लागतात(8 Simple Eye Exercises To Keep Your Eyes Healthy).

आपल्यापैकी बरेचजण दिवसातील सर्वाधिक काळ मोबाइल, लॅपटॉपच्या किंवा आणखी कोणत्या तरी स्क्रीनसमोर असतात. सतत स्क्रीनसमोर डोळे असल्याने डोळ्यांना येणारा थकवा, कोरडेपणा, डोळे चुरचुरणे, कोरडे होणे अशा एकाहून एक समस्या निर्माण होतात. स्क्रीनवर सतत काही ना काही पाहण्यात व्यस्त असणाऱ्या या डोळ्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर या समस्या वाढतात. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काही व्यायाम केल्यास या समस्या दूर होण्यास मदत होते. जर आपण सुद्धा दिवसांतील जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर बसून घालवत असाल तर थोडा वेळ ब्रेक घेऊन डोळ्यांना आराम देण्यासाठी हे साधेसोपे एक्सरसाइज नक्की ट्राय करावेत. यामुळे डोळ्यांना आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. सारखं स्क्रीनकडे पाहून डोळ्यांना येणारा ताण दूर होण्यासाठी डोळ्यांचे कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज करायला हवेत याविषयी माहिती घेऊयात(How to reduce computer eye strain 8 exercises for relief). 

दिवसभर डोळ्यांसमोर स्क्रीन असेल तर... 

१. आजुबाजूला झाडे असतील तर स्क्रीनपासून डोळे बाजूला घेऊन काही वेळ नैसर्गिक हिरव्या रंगाकडे पाहा. त्यामुळे डोळ्यांना आलेला ताण निघून जाण्यास मदत होईल. तुमच्यापासून जवळपास २० फूट लांब असणाऱ्या एखाद्या हिरव्यागार झाडाकडे सलग २० सेकंद पाहा. दर २० मिनीटांनी २० फूट दूर असलेली वस्तू २० सेकंदासाठी पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे एकसलग स्क्रीनकडे पाहिल्याने येणारा ताण जाण्यास मदत होईल. 

२. आपल्या हाताचा अंगठा अगदी बरोबर आपल्या डोळ्यांसमोर येईल असा धरावा. या अंगठयाच्या बरोबर वरच्या टोकावर आपली नजर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. असे करत असताना आपला हात पुढे - मागे असा हलवत राहा. 

सामोसा-गुलाबजाम खाल्ले भरपूर तर तेवढ्या कॅलरी जाळायला तुम्हाला किती चालावं लागेल, माहिती आहे?

३. डोळे एकदा उजव्या आणि एकदा डाव्या बाजूला फिरवा. असे किमान ८ ते १० वेळा करा. त्यामुळे एकाच ठिकाणी पाहून डोळ्यांना ताण येत असेल तर तो येणार नाही. 

४. स्क्रीनवर काम करताना ठराविक वेळाने डोळे बंद करुन हाताचे तळवे एकमेकांवर घासून मग ते डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे रिलॅक्स व्हायला मदत होईल. दोन्ही हात एकमेकांवर घासल्याने त्यातून निर्माण झालेली उष्णता डोळ्यांना द्या. त्यामुळे बराच काळ स्क्रीनकडे पाहून डोळ्यांना थकवा आला असेल तर तो दूर होण्यास मदत होईल.

५. डोळे बंद करुन एका बाजूने गोल फिरवा, त्यानंतर थोडावेळाने पुन्हा उलट्या बाजूने (घड्याळ्याच्या काट्यांप्रमाणे) गोल फिरवा. असे ८ ते १० वेळा करा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होईल.

६. कामाच्या मधून स्क्रीनवरुन डोळे बाजूला करुन डोळ्यांची काहीवेळा सतत उघडझाप करा. यामुळे डोळ्यांना ताण येणार नाही, तसेच डोळ्यातील द्रव्य टिकून राहण्यास मदत होईल आणि डोळे कोरडे होणार नाहीत. 

चिया सीड्स ‘या’ ५ पदार्थांसोबत चुकूनही खाऊ नका, पोटदुखीने गडबडा लोळाल- पित्तही खवळेल कारण...

७. दिवसातून किमान ४ ते ५ वेळा डोळे थंड पाण्याने धुवा. त्यामुळे डोळे कोरडे होणार नाहीत आणि डोळ्यांवर आलेला ताण निघून जाण्यास मदत होईल. 

८. कामातून थोडा वेळ काढून एका ठराविक वेळेनंतर मान एका जागी स्थिर ठेवून डोळ्यांची वर - खाली अशी हालचाल करावी. यामुळे सतत स्क्रीनकडे पाहून थकलेले डोळे रिलॅक्स होण्यास मदत मिळते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगा