स्तनाच्या कर्करोगाचं संपूर्ण जगातलं चित्रं तसं काळजी वाढवणारं आहे. भारतात दर चार मिनिटाला एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचं कळतं. स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण बघता त्यापासून वाचण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करु शकतो याबाबत आहारतज्ज्ञ स्वाती बाथवाल यांनी काही उपाय सूचवले आहेत.
Image: Google
स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी..
1. शारीरिक पातळीवर आपण किती हालचाली करतो हे खूप महत्त्वाचं आहे. या जाणीवपूर्वक हालचालींसाठी व्यायाम महत्त्वाचा असतो. व्यायामानं केवळ वजनच नियंत्रित होतं असं नाही. व्यायामामुळे शरीरातील अँस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांची पातळी कमी होते. आठवड्यातून पाच तास व्यायाम करणं आवश्यक आहे. एवढा व्यायाम झाला तर शरीरातील या हार्मोन्सची पातळी 20 टक्क्यांनी खालावते. स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी आठवड्यातले पाच दिवस रोज 45 मिनिटं व्यायाम करावा.
2. आपल्या शरीरात असलेल्या मेलाटोनिन हे हार्मोन आपल्या झोपेसाठी महत्त्वाचं असतं. शरीरात जर पुरेशा प्रमाणात मेलाटोनिन असेल तर स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो . हे हार्मोन मेंदूत असलेल्या पीनियल ग्रंथीमधून स्त्रवतं. ही ग्रंथी सकाळी निष्क्रिय असते. पण जसा आपल्या आजूबाजूला अंधार पसरु लागतो तसं मेलाटोनिन हे हार्मोन स्त्रवायला लागतं. रात्रीचा कृत्रिम प्रकाश हा मेलाटोनिन हार्मोनला दाबून टाकतो. त्यामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोन्सची कमतरता निर्माण होते. हे हार्मोन पुरेशा प्रमाणात निर्माण होण्यासाठी रात्री झोपताना लाइट बंद करावेत. रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहू नये. यामुळे रात्रीची झोपही छान लागते.
Image: Google
3. आहारात सोयाबिन असल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. सोयाबीनमधील घटक शरीरास स्तनांच्या कर्करोगापासून वाचवतात. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा सोयाबीन खाण्याला आहारतज्ज्ञ महत्त्व देतात.
4. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. कॅन्सरच्या पेशी अँस्ट्रोजन तयार करण्यासाठी याच बॅड कोलेस्टेरॉलचा उपयोग करतात. आहारतज्ज्ञ स्वाती बाथवाल यासाठी आवळा पावडरचं सेवन करण्याचा, आहारात पालेभाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलवर नियंत्रण येतं.
5. स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी जवस खाण्याला विशेष महत्त्व आहे. जवसामधे अँस्ट्रोजनचा प्रभाव कमी करण्याचे गुणधर्म असतात. स्तनांच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी रोज एक चमचा जवस खायला हवेत. जवसाची चटणी, किंवा कोशिंबीर यामधे जवस घालू शकतो, वरण- आमटी करताना जवसाचा उपयोग करता येतो.
Image: Google
6. यकृतातील विषाक्त घटक बाहेर टाकण्याची विकरांची गती वाढवण्यासाठी ब्रोकोली, पालक या हिरव्या भाज्या महत्त्वाच्या असतात. तसेच आहारात पुरेशा भाज्या आणि फळांचा अभाव हा आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. आहारात फळं, भाज्या, धान्यं यांचा समावेश पुरेशा प्रमाणात असला तर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहाते आणि कर्करोगाचा धोकाही टळतो.
Image: Google
7. स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी आहारतज्ज्ञ स्वाती बाथवाल दिवसातून कमीत कमी 3 वेळा ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. ग्रीन टी च्या सेवनामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो.
8. काळी द्राक्षं बियांसकट खाल्ल्याने स्तनाच्या कर्करोग पेशींची वाढ रोखली जाते. तसेच मशरुम, स्ट्रॉबेरी, डाळिंब यांच्या सेवनाननंही स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. एक संशोधन सांगतं की रोज अर्धा कप पांढरे मशरुम खाल्ल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका 64 टक्क्यांनी कमी होतो.