पित्त होणे ही सध्या अनेकांच्या आयुष्यातील अतिशय सामान्य बाब झाली आहे. महिलांमध्येही सततची जागरणे, जंक फूडचे सेवन, व्यसनाधिनता, वाढते ताणतणाव यांसारख्या कारणांनी होणारे पित्त दिवसेंदिवस वाढत जाते. मग मळमळ, उलट्या, पोटात आग पडल्यासारखे वाटणे, छातीत होणारी जळजळ, गॅसेस यांमुळे जीव हैराण होऊन जातो. रोजची दगदग आणि कामं तर केल्यावाचून पर्याय नसतो आणि एकीकडे पित्त काही कमी व्हायचे नाव घेत नसते. अशावेळी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन सर्रास पित्ताच्या गोळ्या खरेदी केल्या जातात. वारंवार या गोळ्या घेतल्याही जातात. पण या गोळ्या सतत घेतल्याने त्याचे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात हे अनेकांना माहितही नसते. मर्यादेपेक्षा जास्त पित्ताची औषधे घेतल्यास त्याचा किडनीवर घातक परिणाम होतो. त्यामुळे तुम्हीही सतत अशाप्रकारच्या गोळ्या घेत असाल तर सावध व्हा.
हे लक्षात घेऊन फूड अँड ड्रग असोसिएशनने पित्तशामक औषधांवर यापुढे सावधानतेचा इशारा लिहीणे बंधनकारक करण्यात आले आहे. या औषधांच्या सततच्या वापराने किडनीवर दुष्परिणाम होतो असा इशारा यापुढे लिहीला जाईल. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलले असून त्याबाबत रुग्णांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. पित्तशामक औषधे उत्पादन करणाऱ्या सर्वांना असा इशारा छापण्याबाब आदेश देण्यात यावेत असे राज्याच्या औषध नियंत्रक यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे. ही बाब स्वागतर्ह असून याचा सकारात्मक परिणाम व्हायला मदत होईल अशी आशा आहे.
याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांना विचारले असता ते म्हणाले, हल्ली सर्वच स्तरातील लोकांना पित्ताचा त्रास होतो. महिलांमध्येही पित्ताचा त्रास होण्याचे प्रमाण अधिक असते. दगदग, बाहेरचे खाणे, सततच्या पार्ट्या आणि त्यामुळे जागरण यांमुळे पित्ताचा त्रास वाढत जातो. काही जण यावर घरगुती उपाय करतात, मात्र पित्त लवकरात लवकर थांबावे यासाठी सतत औषधे घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या गोळ्या महिन्या दोन महिन्यातून ५ ते ७ दिवसांपर्यंत घेतल्या तर ठिक आहे. पण ६ आठवड्यांहून अधिक काळ या गोळ्या घेत राहील्यास त्याचा किडनी घातक परिणाम होतो, याबरोबरच या औषधांचा मेंदू, हृदय यांच्यावरही याचा परिणाम होतो. शरीरातील रासायनिक घटक किडनी आणि यकृत या अवयवांमधून बाहेर पडतात. पण या घटकांचे प्रमाण जास्त झाले तर ते संबंधित अवयवाला बाधक ठरु शकतात. तसेच औषधांमधील हे घटक रक्तात साचत जातात. शरीर हे घटक शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. पण पुरेशा प्रमाणात ते बाहेर टाकले गेले नाहीत तर त्याचा अवयवावर परिणाम होतो. अशाप्रकारे पित्तशामक औषधांचा किडनीवर परिणाम होतो.
डॉ. भोंडवे यांनी सांगितले, कोणतेही औषध जास्त गरज असेल तेव्हाच घ्यायचे असते. तसेच ते किती घ्यायचे, कसे घ्यायचे याचे प्रमाण असते. त्यामुळे डॉक्टरांना विचारुन, त्यांच्या सल्ल्यानेच अशापद्धतीची औषधे घ्यायला हवीत. अनेक जण कित्येक महिने किंवा अगदी वर्षानुवर्षेही अशा प्रकारची औषधे घेत असतात. याबरोबरच पेनकिलरसारख्या गोळ्याही वारंवार घेऊ नये. रुग्णांनी कोणतीही औषधे घेताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. तसेच डॉक्टरांनीही रुग्णांना याबाबत वेळीच माहिती द्यायला हवी. तसेच डॉक्टरांनीही रुग्णांना औषध लिहून देताना किती दिवस घ्यायचे याबाबत माहिती द्यायला हवी.