सकाळी उठल्यापासून ओट्यापाशी उभं राहायचं, सगळं आवरायचं आणि ऑफीसला जायचं. तिथे जाऊनही दिवसभर खुर्चीत बसायचं आणि पुन्हा घरी आलो की ओट्यासमोर काम असतं. हे सगळं करता करता आपल्या शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर ते आपल्या लक्षातही येत नाही. रात्री झोपताना पाठ टेकली की आपण दिवसभर किती धावाधाव केलीये हे आपल्या लक्षात येतं. सकाळी उठतानाही बेडमधून उठूच नये असंही अनेकदा वाटतं. इतकंच नाही तर कधी अचानक कंबरदुखी इतकी सतावते की काहीच सुधरत नाही. अशावेळी नेमकं काय करावं आपल्याला कळत नाही. रोजच्या धावपळीत व्यायामाला वेळ मिळत नाही ही अनेकांची तक्रार असते (Actress Bhagyashree Exercise Tips for Lower Back Pain Partner workout).
पाठ, कंबर, मणका हे आपल्या संपूर्ण शरीराला व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे आपण कितीही धावपळीत असू तरी थोडा वेळ काढून आपल्या कंबरेच्या, पाठीच्या दुखण्यावर उपयुक्त असे व्यायामप्रकार आवर्जून करायला हवेत. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री कायम फिटनेस, डाएट, ब्यूटीबाबत काही ना काही माहिती आपल्या चाहत्यांना देत असते. यासाठी ती इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करते. भाग्यश्रीच्या फॉलोअर्सची संख्या मोठी असून तिचे विविध बाबतीतील मार्गदर्शन अनेकांना उपयुक्त ठरणारे असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत काही व्यायाम करताना दिसत आहे.
कंबरदुखी आणि पाठदुखीसाठी अत्यंत उपयुक्त असे हे व्यायामप्रकार कसे करायचे हे भाग्यश्रीने यामध्ये सांगितले आहे. आपल्या पोस्टला कॅप्शन देताना भाग्यश्री म्हणते, “गेट रेडी फॉर परफेक्ट पार्टनर वर्कआऊट, पाठीच्या खालच्या भागासाठी हे अतिशय रिलॅक्सिंग आहे. कधी कधी बायकोचे वजन उचलायला हवे..”असे म्हणत ती पुढे हसण्याची स्माईलही टाकते. “तुमच्या दोघांची उंची सारखी असेल तर हे व्यायाम आणखी छान पद्धतीने करता येतात. पण तुम्हाला पाठीच्या दुखण्याचा जास्तच त्रास असेल तर मात्र हे व्यायाम करण्याआधी तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करायला हवी.” #Tuesdaytipswithb असा हॅशटॅग वापरत तिने या खास टिप्स शेअर केल्या आहेत.
१. कंबरदुखीसाठी परफेक्ट स्ट्रेच
हात बाजूला पसरुन पाठीवर झोपायचे. आपल्या पार्टनरला वज्रासनात बसायला सांगायचे. आपले पाय मागून त्याच्या खांद्यावर ठेवायचे आणि त्याला पाठीतून खाली वाकायला लावायचे. २ ते ३ मिनीटांसाठी याच अवस्थेत थांबून मग पुन्हा पार्टनरला कंबरेतून वर व्हायला सांगायचे. यामुळे पाठीच्या मणक्याला चांगला ताण पडतो आणि याचा कंबरदुखी कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होतो. हे करताना आपले शरीर एकदम हलके सोडावे असेही भाग्यश्री सांगते.
२. उभे राहून करता येणारे स्ट्रेचिंग
एकमेकांच्या पाठीला पाठ टेकून उभे राहायचे. नंतर पार्टनरने आपले हात मनगटापाशी धरुन कंबरेतून खाली वाकायचे. यामुळे आपण नकळत त्यांच्या पाठीवर जातो. काही वेळ पार्टनरच्या पाठीवर वजन टाकल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखे खाली यायचे. असे ४ ते ५ वेळा केल्यास पाठीच्या मणक्याला चांगला आराम मिळू शकतो.