Join us   

कितीही झोपलो तरी झोप पूर्णच होत नाही? सतत थकवा वाटतो, पाठदुखी सतावते? 3 सोपे उपाय - मिळेल पूर्ण आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 3:33 PM

Add 3 Things to Your Night Routine For Better Sleep : नाईट रुटीनमध्ये या 3 गोष्टींचा समावेश केल्यास आपलं झोपेचं रुटीन चांगलं सेट होऊ शकतं.

दिवसभर सगळीकडे धावपळ करताना आपण इतके थकून जातो की रात्री बेडवर पाठ टेकली तरी आपल्याला अनेकदा झोपच येत नाही. अशावेळी आपण बरेचदा या अंगावरुन त्या अंगावर होतो तरीही काही केल्या डोळा लागत नाही. कधी डोक्यात नको ते विचार येत राहतात तर कधी हातात मोबाइल असल्याने नकळत आपण त्यावर स्क्रोलिंग करत राहतो. आरोग्य उत्तम राहावं यासाठी झोप ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे रोज किमान ७ ते ९ तास झोप होणं आवश्यक असतं. झोपेवर आपल्या तब्येतीचे सगळे गणित अवलंबून असते.

अनेकदा आपण ७ ते ८ तास झोपतोही. मात्र तरी उठल्यावर आपल्याला फ्रेश आणि ताजतवानं वाटत नाही. अनेकदा आपल्याला झोप पूर्ण झाली तरी खूप थकल्यासारखे वाटते तर कधी खूप ताण आल्याचा फिल येतो. काही वेळा तर पाठ इतकी दुखते की झोप झाली तरी आणखी पडून राहावेसे वाटते. असे होण्यामागे असंख्य कारणे असतात. पण असे होऊ नये आणि आपल्याला पडल्यावर गाढ शांत झोप लागावी, तसेच झोप झाल्यावर फ्रेश वाटावे यासाठी काही सोपे उपाय करण्याची आवश्यकता असते. नाईट रुटीनमध्ये या गोष्टींचा समावेश केल्यास आपलं झोपेचं रुटीन चांगलं सेट होऊ शकतं.

(Image : Google)

१. झोपताना न चुकता पाय धुणे 

पाय धुण्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. इतकेच नाही तर ताण कमी होण्यासही याचा चांगला उपयोग होतो. तसेच झोपेची गुणवत्ता सुधारण्यासही याची चांगली मदत होते. पाय धुतल्याने त्यावर असणारा घाम, धूळ, घाण आणि विषाणू निघून जाण्यास मदत होते. तसेच यामुळे पायाला येणारा वासही दूर होतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते. 

२. पायाला मसाज करणे 

पायाला मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे नसा मोकळ्या होतात आणि शरीराला एकप्रकारचा आराम मिळतो. झोपण्याआधी पायांना मसाज केल्यास पाय दुखत असतील तर वेदना कमी होतात आणि विश्रांतीची भावना उत्तेजित होण्यास मदत होते. 

३. जमिनीवर झोपावे 

नियमित शक्य नसेल तरी आठवड्यातून २ वेळा आवर्जून जमिनीवर झोपायला हवे. यामुळे मणक्याला आराम मिळण्यास मदत होते. जमिनीवर झोपल्याने नैसर्गिकपणे मणका जुळवून घेण्यास मदत होते. यामुळे शरीराच्या जागरुकतेचा अनुभव घेता येतो. जमिनीवर झोपल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत गादीवर जास्त गरम होते त्यामुळे खाली झोपल्यावर चांगली झोप लागण्यास मदत होते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल