भरपूर चीजयुक्त पिझ्झा, बर्गर, सॅण्डवीच असे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. छोट्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळेच जण प्रत्येक पदार्थात चीज टाकून खात असतात. चीजमध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. त्यात प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीशियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि विटामिन के-2 सारखे तत्व आढळतात. एक चीज स्लाईस एक ग्लास दूधाइतके मानले जाते. मात्र, अतिरिक्त प्रमाणात चीज खाल्ले तर त्याचा फटका आपल्या शरीराला भोगावा लागतो. अतिरिक्त चरबी, हाई कोलेस्ट्रॉल, डिहाइड्रेशन आणि हृदय संबंधीत आजार शरीरामध्ये उद्भवतात. कोणतेही पदार्थ एका प्रमाणात खाल्ले तर उत्तम मानले जाते. मात्र, त्याचा अतिरेक झाला तर त्याचा फटका साहजिकच शरीराला सहन करावा लागतो. आज आपण चीजचे अतिरिक्त सेवन केल्याने काय होते याची माहिती जाणून घेणार आहोत.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या महणण्यानुसार, एक प्रौढ व्यक्ती दिवसातून 40 ग्रॅम चीज खाऊ शकतो. त्याच वेळी, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी देखील संतुलित प्रमाणात चीज खाण्याचा सल्ला दिला आहे.
रुजुता म्हणतात, “चीज एक प्रोटीनचा चांगला स्रोत आहे, चीज जोपर्यंत ताजे आणि शुद्ध आहे. तोपर्यंतच आपल्या शरीरासाठी चांगले आहे. यासोबतच आपल्या दिनक्रमात अशा शारीरिक हालचालींचा समावेश करावा, जेणेकरून त्यातून मिळणाऱ्या कॅलरी बर्न होऊ शकतात."
मोठ्यांपेक्षा सध्या लहान मुले जास्त चीज खात आहेत. कोणत्याही डिशची चव वाढवण्यासाठी बहुतांश लोकं चीजचा अधिक वापर करीत आहेत. चीज त्यांच्या वाढत्या वयात हाडांच्या विकासासाठी मदत करते. पण जेव्हा तीच मुलं शारीरिक हालचालींऐवजी दिवसभर गेमिंगमध्ये वेळ घालवतात, तेव्हा त्यांच्यातही लठ्ठपणा येऊ शकतो."
लठ्ठपणा
वाढत्या वयाबरोबर महिला आणि पुरुष दोघांच्या पोटावर चरबीचा थर जमा होऊ लागतो. दुसरीकडे, आपण जेव्हा चीज युक्त पदार्थ खातो, तेव्हा चीजपासून मिळणार्या कॅलरीज बर्न करण्यासाठी फार वेळ जातो, मग ते चरबीच्या रूपात पोटावर आणि कंबरेवर जमा होऊ लागतात. आणि ही चरबी आपल्या शरीरासाठी घातक आहे.
पचन समस्या
शारीरिक हालचालींशिवाय दररोज 40 ग्रॅम चीज खाणे देखील शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामध्ये गॅस, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ यांचा समावेश आहे.
हृदयाच्या आरोग्यासाठी धोका
वाईट जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वाईट कोलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका अधिक वाढत चालला आहे. जर बैठी जीवनशैली असेल, तर आहारातून चीज किंवा बटर वगळणे उत्तम ठरेल. चीजमध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
उच्च रक्तदाब
2019 च्या NCBI अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, सोडियमचे सेवन अधिक केल्याने त्याचा थेट परिणाम उच्च रक्तदाबेवर होतो. जर रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर आपण दिवसभरात 2400 मिलीग्राम सोडियमपेक्षा जास्त सेवन करू नये. चीजमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.