Join us   

अक्षय्य तृतीयेला दणकून आमरस खा, पण लक्षात ठेवा ३ गोष्टी, तरच आंबा बाधणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 1:43 PM

Akshaya Tritiya 3 tips While Having Amaras Mango pulp Diet Tips : आमरस करताना आणि खाताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे, या गोष्टी कोणत्या ते पाहूया...

अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी घरोघरी आवर्जून आमरस पुरीचा बेत केला जातो. बहुतांश जण अक्षय्य तृतीयेपासून आंबा खायला सुरुवात करतात. फळांचा राजा असलेला हा आंबा म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे फळ. महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ असलेल्या आमरसाची चव चाखण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते. आंब्यामध्ये हापूस, पायरी, केसर, गावठी आंबा असे अनेक प्रकार असल्याने महाराष्ट्राच्या विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीने आमरस केला जातो. अनेकदा आपल्याला आमरस आवडतो म्हणून आपण त्यावर ताव मारतो. पण नंतर मात्र शरीराला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. आंब्यामध्ये जास्त कॅलरीज असतात, तसेच तो प्रकृतीनेही उष्ण असतो. त्यामुळे आमरस करताना आणि खाताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे, या गोष्टी कोणत्या ते पाहूया (Akshaya Tritiya 3 tips While Having Amrasa Mango Juice Diet Tips)...

(Image : Google)

१. आमरसावर अजिबात पाणी पिऊ नका..

आमरस खाताना किंवा खाऊन झाल्यावर एक गोष्ट अजिबात करायची नाही. ती म्हणजे आमरसावर पाणी पिणे. उन्हाळ्यामुळे आपली लाहीलाही होत असते. त्यामुळे आपल्याला सतत पाणी पाणी होते. गोड आणि तेलकट खाल्ल्यावर तर पाणी जास्त प्यावेसे वाटते. असे असले तरी आमरसाचे जेवण झाल्यावर किंवा आंबा खाल्ल्यावर अजिबात पाणी प्यायचे नाही. कारण आंब्यावर पाणी प्यायल्याने जुलाब, गॅसेस, अजीर्ण यांसारखे अपचनाशी निगडीत त्रास होऊ शकतात. त्यामुळे आमरसाचे जेवण झाल्यावर किमान १ तास पाणी पिऊ नये

२. आमरस खाल्ल्यावर लगेच झोपू नका

आमरस हा पचायला काहीसा जड असतो. आंब्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. तसेच आमरस म्हटल्यावर त्यासोबत पुऱ्या, तळण असे इतर पदार्थही असतात. त्यामुळे आमरस खाल्ल्यानंतर तो पचावा यासाठी किमान शतपावली करायला हवी. तसेच दुपारी आमरसाचे जेवण केले असेल तर रात्री हलका आहार घ्यायला हवा. 

(Image : Google)

३. आमरस करताना, खाताना लक्षात ठेवा

आमरस करायच्या आधी किमान अर्धा तास तरी आंबे पाण्यात भिजवून ठेवावेत. तसेच आंब्याच्या वर चिक आलेला असेल तर तो स्वच्छ धुवून मगच आंबा खावा. तसेच आमरसात शक्यतो तूप, मिरपूड घालून आमरस खायला हवा, म्हणजे आंबा बाधत नाही. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनाआंबा