मोबाइल हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला मोबाइल आपल्या जवळ हवा असतो. मोबाइलमुळे कामं सोपी झाली हे खरं असलं तरी आरोग्यासाठी मोबाइल कसा हानिकारका आहे हे आता समोर येत आहे. तरीही हातातून मोबाइल सोडवत नाही हे वास्तव आहे. पण अभ्यासक, संशोधक मोबाइलच्या आरोग्यास असलेल्या धोक्यांबाबत सुचित करत आहेत. मोबाइल संदर्भात नुकताच एक अभ्यास झाला. सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामाला म्हणून फिरायला जाताना हातात मोबाइल असल्याचे काय परिणाम होतात हे हा अभ्यास सांगतो.
चालायला जाताना हातात मोबाइल असण्याचे किंवा चालता चालता मोबाइलवर सतत मॅसेजेस बघण्याचे परिणाम आरोग्यावर होतात असं हा अभ्यास सांगतो. चालता चालता मोबाइल वापरल्यानं अनेक आजार चिटकू शकतात. तसेच या सवयीचे मानसिक परिणामही होतात. त्यामुळे ही सवय घातक असून ती सोडावी यासाठी अभ्यासकांनी चालता चालता मोबाइल वापरण्याचे दुष्परिणाम सविस्तर सांगितले आहेत.
छायाचित्र- गुगल
चालता चालता मोबाइल वापरण्याचे परिणाम
1. स्नायुत वेदना- सकाळी व्यायाम म्हणून चालताना मोबाइल वापरल्यास स्नायुंमधे वेदना होवू शकतात. चालताना आपले हात एका स्थितीत नसतात. ते वरखाली हालत असतात. या हालचालीमुळेच चालताना आपल्या हाताचा आणि हाताच्या स्नायुंचा व्यायाम होत असतो. पण चालताना मोबाइल हातात असेल तर मात्र हातांच्या स्नायुंमधला समतोल ढळतो आणि स्नायुंमधे वेदना होतात. या वेदनांपासून बचाव करायचा असेल तर अभ्यासक सांगतात सकाळी चालायला जाताना एकटेच जा सोबत मोबाइल नेऊ नका.
2. शरीराची ठेवण बिघडते- सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम म्हणून चालायला जाताना मोबाइल वापरला तर शरीराची ठेवण बिघडण्याचा धोका असतो. चालताना पाठीचा मणका ताठ असायला हवा. पण जर चालताना हातात असलेला मोबाइल वापरला जात असेल तर आपलं लक्ष समोर न राहाता हातातल्या मोबाइलवर असतं. त्यामुळे मान खाली झुकलेली असते. त्याचा परिणाम म्हणून पाठीचा कणाही ताठ राहात नाही. रोज चार पाच किलोमीटर लांब चालणारे जेव्हा मोबाइल घेऊन चालतात तेव्हा शरीराची ठेवणही बिघडते.
छायाचित्र- गुगल
3. कंबरदुखीचा त्रास- चालताना मोबइल वापरणं हे कंबरदुखीचं कारण होतं. चालायला जाताना मोबाइल सोबत न नेणं हे उत्तम. यामुळे अनेक त्रासांपासून आपण आपला बचाव करु शकतो.
4. एकाग्रता भंगते- व्यायामाचा मग तो चालण्याचा असो की दोरीवर उड्या मारण्याचा असो, त्याचा फायदा शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही प्रकारे होत असतो. व्यायम करताना लक्ष एकाग्र होतं. त्याचा फायदा आपल्याला काम करताना होतो. पण हातात मोबाइल असला की शरीर फक्त चालत असतं, मन मात्र हातातल्या मोबाइलमधेच गुंतलेलं असतं. त्यामुळे व्यायाम करताना शरीर मनाकडे लक्ष केंद्रित होतच नाही. मोबाइलमुळे मनाची एकाग्रता भंगते. कशातही लक्ष न लागणं हा याचाच परिणाम.