कधी कधी आपणही याच अनुभवातून जातो. सकाळी उठतो, पण आपल्याला काही फ्रेश वाटत नाही. कोणतेही काम करायला उत्साह राहत नाही. सकाळी उठल्यावर दुपारी कधी एकदा वामकुक्षी घेतो असं वाटतं किंवा मग कधी रात्र होईल आणि आपण कधी झोपू शकू याची वाट आपण बघत राहतो. बहुतांश महिला या अनुभवातून जात असतात. महिलाच नाही तर अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना देखील हा त्रास होतो. बहुतांश महिलांना या तक्रारी असतात, पण त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जातं. थकवा येणं हे वरवर दिसतं तेवढं सहज नाही. याकडे गांभिर्याने लक्ष दिलं पाहिजे.
ही असू शकतात तुमच्या थकव्याची कारणं.... १. अपूरी झोप शांत झोप न लागणं हे थकवा येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. काही जणींना रात्री झोपण्यास उशीर होतो आणि सकाळी लवकर उठावं लागतं. दिवसभर कामाचा ढीग उपसावा लागतो. अपूर्ण झोप आणि दिवसभर काम यामुळेही काही जणींना प्रचंड थकवा आलेला असतो. ज्यांना खूप थकल्यासारखं होतं, अशा महिलांनी सलग दाेन- तीन दिवस आराम केला पाहिजे. किंवा दोन- तीन दिवस तरी रात्रीची झोप ८ तासांची मिळेल, असे नियोजन केले पाहिजे.
२. ॲनिमिया ॲनिमिया म्हणजेच रक्तशय असणाऱ्या महिलांना खूप अशक्तपणा जाणवतो. शरीरात रक्ताची, लोहाची कमतरता असेल तर ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत कमी प्रमाणात पोहचतो. पेशींना पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने पेशींमधील थकवा आपणास जाणवू लागतो. त्यामुळे जर खूपच थकवा जाणवत असेल तर एकदा हिमोग्लोबीनची तपासणी करून घ्यावी.
३. शुगर लेव्हल कमी होणे रक्तामधील साखरेचे प्रमाण जेव्हा लक्षणीय प्रमाणात कमी होते, तेव्हा प्रचंड थकवा जाणवतो. कारण शरीरात उर्जा निर्माणकरण्यासाठी साखरेचे योग्य प्रमाण शरीरात असणे खूप गरजेचे असते. त्यामुळे जर खूप थकवा येत असेल तर डाएटिंगमुळे आपण खूपच कमी साखर सेवन करत आहोत का, हे देखील एकदा स्वत:चे स्वत: तपासून पहावे.
४. मासिक पाळीतील अतिरक्तस्त्राव अनेक स्त्रियांना मासिक पाळीत खूप जास्त ब्लिडींग होत असते. यामुळे देखील अनेकींना थकवा जाणवू शकतो. तसेच शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी झाली तरीही अनेक जणींना थकवा, आळस, खूप झोप येणे असा त्रास होतो.
आहारात करा असा बदल ज्यांना वारंवार थकवा येतो किंवा कायम झोप आल्यासारखे वाटते अशांनी हिरव्या पालेभाज्या, काळ्या मनुका, बीट, खजूर, टोमॅटो, व्हिटॅमिन सी असणारी फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली पाहिजेत. तसेच चहा- कॉफी, कोल्ड्रिंक यांचे सेवन जर जास्त प्रमाणात होत असेल तर ते देखील टाळले पाहिजे.