आपण जन्माला आलो म्हणजे कधी ना कधी या जगातून जाणार हे जरी खरं असलं तरी आपण जास्तीत जास्त जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं. वयाची ९० वर्षे किंवा १०० वर्षे जगलेली माणसं आजुबाजूला पाहिली की आपल्याला त्यांच्या तब्येतीचा हेवा वाटतो. एकीकडे तरुण असताना आपण सतत काही ना काही कुरबुरी करतो आणि या व्यक्ती इतकं वय होऊनही ठणठणीत असतात. आता इतके वर्ष जगणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याचे सिक्रेट नेमके काय असते, जीवनशैलीतील कोणत्या गोष्टी त्यांना जास्ती वर्षे जगण्यासाठी कारणीभूत असतात हे समजून घेणे गरजेचे आहे.
तर या व्यक्ती जेवणाच्या बाबतीत काही महत्त्वाचे नियम पाळतात. ज्यामुळे त्यांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. अमेरिकन जरनल ऑफ लाईफस्टाइल मेडिसिनने केलेल्या एका संशोधनानुसार हे लोक सर्वात महत्त्वाचा ८०-२० चा नियम जेवताना पाळतात. म्हणजेच ८० टक्के पोट भरल्यावर ते त्याहून जास्त खात नाहीत. पोटातील २० टक्के जागा ते रिकामी ठेवतात. याशिवायही हे लोक जेवणाच्या बाबतीत काही महत्त्वाचे नियम पाळतात ते कोणते ते पाहूया...
१. भाज्यांचे जास्त सेवन
भाज्या आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक असून पालेभाज्या, फळभाज्या, सॅलेड यांसारख्या सर्व प्रकारच्या भाज्यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश असायला हवा. इतकेच नाही तर वेगवेगळ्या रंगाच्या आणि जास्तीत जास्त कच्च्या किंवा फारतर वाफवलेल्या भाज्यांचे प्रमाण आहारात जास्त असायला हवे. परदेशात सॅलेड जास्त प्रमाणात खाल्ले जात असल्याने याठिकाणच्या लोकांचे आयुर्मान जास्त असल्याचे दिसते.
२. साखर न खाणे
साखर ही आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. आपण चहा, कॉफी किंवा गोड पदार्थांच्या माध्यमातून दररोज मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन करतो. पण साखरेमुळे शरीराचे नुकसान होत असल्याचे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्याला दिर्घकाळ जगायचे असेल तर साखरेला आहारातून बाय बाय करणे आवश्यक आहे.
३. सावकाश जेवणे
आपण अनेकदा घाईगड़बडीत खूप वेगाने जेवतो. एकीकडे ऑफीसचे किंवा घरातील काम आणि दुसरीकडे जेवण असे करतो. पण त्यामुळे आपल्याला खाल्लेले अन्न नीट पचत नाही. त्यामुळे जेवताना सावकाश जेवावे.
४. बसून जेवणे
हल्ली अनेकदा काही समारंभांमध्ये किंवा एरवीही उभं राहून जेण्याची पद्धत आहे. पण उभं राहून जेवल्याने अन्न योग्यरितीने पचत नाही. त्यामुळे व्यवस्थित बसून जेवणे आवश्यक आहे. यामध्ये खाली मांडी घालून बसणे किंवा टेबल-खुर्चीवर बसणे असे पर्याय असू शकतात. बसून शांतपणे जेवल्याने जेवलेले अंगी लागते.
५. जेवणाआधी रिलॅक्स व्हा आणि नंतर व्यायाम टाळा
जेवणाआधी आपले शरीर आणि मन रिलॅक्स करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण शांतपणे जेवणावर लक्ष केंद्रित करु शकतो. त्यामुळे जेवणाआधी ५ मिनीटे डोले मिटून शांत बसावे. तसेच जेवण झाल्या झाल्या कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. जेवण झाल्यावर अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यासाठी शरीराला थोडा वेळ देण्याची आवश्यकता असते. त्यातच व्यायाम केल्यास शरीरातील स्नायूंना ताण पडतो आणि खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन नाही. त्यामुळे तुम्हाला दिर्घकाळ जगायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.