सध्या थंडीचे दिवस सुरु असल्याकारणाने वातावरणातला गारठा वाढत जात आहे. या वाढणाऱ्या थंडीच्या पाऱ्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. जशी थंडी वाढते तसे घरातील लहान ते थोरांपर्यंत कुणाला न कुणाला सर्दी, खोकला, ताप येतोच. या अशा छोट्याश्या आजारांसाठी आपण डॉक्टरकडे जाणे टाळतो आणि घरीच काहीतरी उपाय करतो. या उपायांपैकी एक सोपा आणि सगळ्यांच्या घरी केला जाणारा उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे. सर्दी, खोकला, ताप, घसा बसणे यांसारख्या आजारांवर आपण पहिला घरगुती उपाय म्हणून गरम पाण्याची वाफच घेतो. ही गरम पाण्याची वाफ घेताना अधिक आराम पडावा म्हणून आपण त्यात विक्स घालून वाफ घेतो. परंतु आपल्याकडील विक्स कधी संपले असेल किंवा विक्सचा वापर न करता नैसर्गिक गोष्टींचा वापर करून सुद्धा आपण सर्दी, खोकला, ताप चटकन पळवू शकतो. कधी आपल्याकडचे विक्स संपले असेल तर आपण नुसत्याच गरम पाण्याची वाफ घेतो. परंतु असे न करता घरच्या घरी आपण एक सोपा उपाय करू शकतो. नक्की हा उपाय काय आहे हे समजून घेऊयात(Steam Inhalation For Cold & Cough).
साहित्य -
१. तुळशीच्या पानांची पावडर - १ टेबलस्पून
२. दालचिनीची पावडर - १ टेबलस्पून
३. लवंगांची पावडर - १ टेबलस्पून
४. काळीमिरीची पूड - १ टेबलस्पून
tulsiayurveda या इंस्टाग्राम पेजवरून नैसर्गिक गोष्टींचा वापर करून सुद्धा आपण सर्दी, खोकला, ताप चटकन पळवू शकतो याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात वाफ येईपर्यंत गरम पाणी उकळवून घ्या.
२. मग गॅस बंद करून हे पाणी गॅसवरून खाली उतरवून घ्या.
३. एका स्वच्छ सुती कापडावर तुळशीच्या पानांची पावडर, दालचिनीची पावडर, लवंगांची पावडर, काळीमिरीची पूड या सगळ्या पावडर एक टेबलस्पून घ्याव्यात.
४. त्यानंतर या पावडर कापडात घेऊन त्यांना गाठ मारून त्याची एक छोटीशी पोटली तयार करावी.
५. ही छोटीशी पोटली या गरम वाफाळत्या पाण्यात सोडावी.
६. वाफाळत्या पाण्यात ही पोटली सोडल्याने ती पावडर पाण्यात मिसळून त्याची जी वाफ येईल ती घ्यावी.
७. अशी वाफ घेतल्याने तुळस, दालचिनी, लवंग, काळीमिरी या घटकांमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे तुमचा सर्दी, खोकला, ताप, घसा बसणे यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल.