आषाढी एकादशीचा उपवास म्हणजे चतुर्थीप्रमाणे संध्याकाळी सोडायचा उपवास नसतो तर पूर्ण दिवसाचा उपवास असतो. तसंच उपवास म्हटल्यावर आपण अतिशय आवडीने तळकट, गोड, वातूळ पदार्थ खाल्लेले असतात. त्यामुळे आपल्याला अॅसिडीटी, गॅसेस होण्याची शक्यता असते. पोटाला आराम मिळावा म्हणून उपवास केला जातो. पण आपण उपवासाचे पदार्थ आवडत असल्याने अतिशय आवडीने साबुदाण्याची खिचडी, वडे, बटाट्याचे पदार्थ आणि इतरही अनेक आरोग्याला घातक असणारे पदार्थ खातो. अनेकांना उपवासानंतर पित्त होणे, मळमळ किंवा उलट्या होणे असे प्रकार होतात (Ashadhi Ekadashi Fasting Tips) .
काही जण कडक उपवास करतात किंवा सारखा साबुदाणा खाणे चांगले नसल्याने बेतानेच खातात. त्यामुळे पोट रिकामे राहते, रात्रीच्या झोपेनंतर मध्ये बराच काळ गेलेला असतो. अशावेळी पोट आणखी काही वेळ रिकामे ठेवणे योग्य नाही. त्यामुळे नाश्ता आवर्जून करायला हवा. पण पोट रिकामे आहे किंवा खूप भूक लागली म्हणून एकदम जास्त खाणे पोटासाठी त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तर आहाराबाबत काळजी घ्यायलाच हवी. पण उपवासाच्या दुसऱ्या दिवशीही आहाराबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी.
चहाला पर्याय काय?
उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शक्यतो चहा टाळलेला चांगला. त्याऐवजी तुम्ही गार दूध किंवा एखादे फळ, सुकामेवा अशा गोष्टी नक्की खाऊ शकता. पौष्टीक लाडू, खजूर हे घेतले तरी पोटाला आराम मिळण्यास मदत होते. उपवासाच्या पदार्थांनी आपले म्हणावे तसे पोट भरत नाही आणि त्यात चहा घेतल्यास पित्त होण्याची शक्यता असते.
नाश्त्याला आणि जेवणातही काय टाळावे
उपवासाच्या दुसऱ्या दिवशी लगेचच जळजळीत मिसळ, वडा सांबार, तिखट ग्रेव्हीची भाजी अशा गोष्टी खाणे टाळावे. तसेच वडे, भजी असे तेलकट पदार्थही उपवासाच्या दुसऱ्या दिवशी खाणे टाळावे. या ऐवजी ताजी फळे, ताक, दही, लिंबू सरबत अशा गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करावा.
नाश्ता कराच
सकाळच्या घाईत अनेकांना नाश्ता करण्याची सवय नसते. घरातली कामं, आवराआवर आणि ऑफीसला पोहोचचण्याची घाई या नादात हे लोक सकाळी चहा-बिस्कीट खाऊन थेट १२.३०-१ वाजता जेवतात. मात्र आदल्या दिवशी उपवास केला असेल तर असे करु नये. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी उपमा, तांदळाची उकड असा पोटला हलका पण तरी पोट भरेल असा नाश्ता आवर्जून करायला हवा. नाहीतर अॅसिडीटी, अपचन, डोकेदुखी होण्याची शक्यता असते.
जेवणात काय घ्याल?
उपवास सोडताना जेवणात रव्याची, तांदळाची , गव्हाची, दलियाची किंवा शेवयाची खीर खावी. कारण खीरीमधे प्रथिनं आणि कर्बोदकं असतात. या आहार घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. उपवास सोडताना खीर खाल्ल्यास उपवास सोडल्यानंतर अशक्तपणा वाटण्याची तक्रार दूर होते. फक्त खीर करताना त्यात साखरेऐवजी गूळ वापरावा.