किडनी स्टोन हे दुखणं असं आहे की त्याचा एकाएकी त्रास व्हायला लागतो आणि मग काहीच सुधरत नाही. शरीरात स्टोन तयार होत असताना आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. मात्र एकाएकी हे दुखणे इतके वाढते की वेदना असह्य होतात. अनेकदा किडनी स्टोन जास्त प्रमाणात वाढल्यास शस्त्रक्रिया करुन तो काढण्याची वेळ येते. आता किडनीमध्ये हे खडे किंवा स्टोन कसे तयार होतात असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो. तर युरिनमध्ये कॅल्शियम, युरीक ॲसिड आणि ऑक्झालेट या घटकांचं प्रमाण वाढतं आणि ते एकत्र येऊ लागतात, तेव्हा युरिन ट्रॅकमध्ये आणि किडनीमध्येही त्याच्या गाठी तयार होतात. त्यालाच आपण किडनी स्टोन किंवा मग मुतखडा म्हणून ओळखतो (Avoid 3 Fruits If You Have Kidney Stone Problem).
खाण्यापिण्याच्या सवयी, अनुवंशिकता, लाईफस्टाईल अशा अनेक गोष्टी किडनीस्टोन होण्यासाठी आणि तो वाढण्यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे वेळीच जीवनशैलीकडे लक्ष दिल्यास हा त्रास कमी होण्याची शक्यता असते. शरीरातील अनावश्यक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनी अतिशय महत्त्वाचे काम करत असते. मात्र किडनीला काही व्याधी झाली तर शरीरातील रक्तशुद्धीच्या कार्यात अडथळे येतात. म्हणून वेळीच आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास हा त्रास नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्याना किडनीशी संबंधित विकार आहेत त्यांनी आहारात शुगर, सोडीयम, पोटॅशियम, फॉस्फरस या गोष्टींचे सेवन शक्यतो टाळावे. आता अशी कोणती फळे आहेत ज्यांच्यात हे घटक असतात, ती आहारात आवर्जून टाळायला हवीत.
१. केळी
केळ्यामध्ये साखर आणि पोटॅशियम दोन्ही जास्त प्रमाणात असल्याने ज्यांना शुगर आणि किडनी स्टोनचा त्रास आहे अशांनी केळं खाणे टाळायला हवे.
२. संत्री
संत्री आरोग्यासाठी चांगली असतात असे आपण नेहमी ऐकतो. मात्र संत्र्यांमध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असल्याने किडनी स्टोन असणाऱ्यांनी संत्री खाणे शक्यतो टाळायला हवे.
३. किवी
किवी हे फळ पांढऱ्या पेशी वाढण्यासाठी चांगले असते. त्यामुळे आपण आवर्जून हे फळ खातो, पण यामध्ये ऑक्सलेट आणि पोटॅशियम असल्याने किडनी स्टोनसाठी हे फळ अजिबात चांगले नसते.