पाणी हा आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आपल्या शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो हे आपल्याला माहित आहे. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यासाठी आणि त्याचे रक्तात रुपांतर होण्यासाठी पाणी महत्त्वपूर्ण कार्य करत असते. म्हणूनच पाणी पिण्याचे प्रमाण,पद्धत,वेळा यांबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी. आपण आहाराबाबत ज्याप्रमाणे काही नियम पाळतो त्याचप्रमाणे पाण्याबाबतही काही नियम आवर्जून पाळायला हवेत. योग्य वेळी, योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.पण हेच पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायले गेले तर मात्र आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. जवळपास ८७ टक्के लोक हे पाणी पिताना काही चुका करतात ज्याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते. याच पाण्याविषयी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात, त्या कोणत्या समजून घेऊया (Avoid 4 mistakes while drinking water)..
१. खूप घाईत पाणी पिणे
अनेकदा आपल्याला खूप जास्त तहान लागते आणि आपण घटाघटा पाणी पितो. मात्र असे पाणी पिणे आरोग्यासाठी योग्य नाही. आपल्या किडणी ठराविक प्रमाणातच पाणी बाहेर टाकण्याचे काम करतात. उरलेले पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाईटसची पातळी कमी जास्त करण्याचे काम करते. त्यामुळे शरीराला पाण्याची आवश्यकता आहे म्हणून एकाचवेळी खूप जास्त प्रमाणात पाणी प्यायले तर त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही.
२. खूप जास्त गार पाणी पिणे
उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा एरवीही अनेकांना गार पाणी पिण्याची सवय असते. यामध्ये अनेकदा फ्रिजमधले पाणी प्यायले जाते. पण गार पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि पचनशक्तीवर याचा विपरीत परीणाम होतो. शरीरात खाल्लेल्या अन्नावर होणारी प्रक्रिया यामुळे बाधित होते आणि त्याचा पचनक्रियेवर ताण येतो. त्यामुळे फ्रिजमधले खूप गार पाणी पिणे टाळलेले केव्हाही जास्त चांगले.
३. जेवताना पाणी पिणे
अनेकांना जेवताना खूप पाणी पिण्याची सवय असते. तिखट लागले म्हणून, कोरडे लागले म्हणून आपण जेवताना एखादा घोट पाणी प्यायले तर ठिक आहे. पण जेवताना सतत पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. कारण अन्नाचा रस तयार होण्याच्या प्रक्रियेत यामुळे अडथळा निर्माण होतो आणि त्याचा पचनक्रियेवर विपरीत परीणाम होतो.
४. प्लास्टीकच्या बाटल्यांतून पाणी पिणे
आपल्यापैकी अनेक जण अगदी सहज प्लास्टीकच्या बाटल्यांतून पाणी पितात. पण या प्लास्टीकमध्ये बिस्पेनॉल ए हा घटक असतो. पाण्याचे तापमान बदलल्यावर किंवा पाणी खूप जास्त काळ बाटलीमध्ये ठेवल्यावर हा घटक पाण्यामध्ये मिसळला जातो. त्यापेक्षा स्टीलची बाटली वापरणे केव्हाही जास्त चांगले.