फळं हा जीवनसत्त्व, खनिजं आणि इतर अनेक घटकांचा उत्तम स्त्रोत असल्याने आपण आहारात फळांचा भरपूर प्रमाणात समावेश करतो. लहान मुलं, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरीक किंवा आजारी व्यक्तींना अन्न जात नसेल तर आवर्जून फळं खाण्यास सांगितले जाते. फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी ती खाण्याचे काही किमान नियम असतात. ते नियम न पाळता आपण फळं खाल्ली तर त्यातून शरीलाचे पोषण होण्याऐवजी शरीराला अपाय होण्याची शक्यता असते. म्हणूनच आहारात फळांचा समावेश करताना ती कोणत्या वेळेला, कशा पद्धतीने, किती प्रमाणात खायला हवीत याबाबतच्या काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. फळं खाताना कोणत्या ४ चुका करु नयेत याविषयी इन्स्टाग्रामवर एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती शेअर करण्यात आली आहे. यामध्ये फळं खाण्याविषयी कोणत्या ४ टिप्स देण्यात आल्यात ते पाहूया (Avoid 4 Mistakes While Eating Fruits)...
१. एकत्र फळं खाणे
काही वेळा आपण फळं खायला घेतो आणि घरात असलेली वेगळ्या गुणधर्माची २ फळं एकत्र खातो. यामध्ये गोड असणारी केळं, सफरचंद, चिकू किंवा पपई अशी गोड फळं आणि संत्री, अननस, द्राक्षं अशा स्वरुपाची आंबट म्हणजेच सायट्रीक गुणधर्म असणारी फळं आपण नकळत एकत्र खातो. पण अशी वेगळ्या गुणधर्माची फळं एकत्र खाल्ल्याने त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्याऐवजी गोड फळं आणि आंबट फळं असं एकत्र खाल्ले तर चालते.
२. फळांवर मीठ घालून खाणे
काहीवेळा आपण कलिंगड किंवा इतर काही फळांवर मीठ, चाट मसाला असे काही ना काही घालून खातो. पण असे करणे चुकीचे असून मीठामुळे फळांना पाणी सुटते आणि त्यातील पोषण आपोआप कमी होते. त्यामुळे फळांवर कधीच मीठ घालू नये.
३. जेवणानंतर लगेच फळं खाणे
अनेकदा आपल्याला नाश्ता किंवा जेवण झाल्यावर फळं खाण्याची सवय असते. मात्र आपण खात असलेले अन्नपदार्थ हे शिजवलेले असतात आणि फळं कच्ची असतात त्यामुळे अन्नावर फळं खाल्ल्यास अन्न तर नीट पचत नाहीच पण फळांपासूनही योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे फळं ही रीकाम्या पोटी किंवा स्नॅक टाईममध्ये खायला हवीत.
४. फळं धुताना
काहीवेळा आपण फळं कापतो आणि मग ती धुतो. भाज्या ज्याप्रमाणे चिरण्याआधी धुवायला हव्यात त्याचप्रमाणे फळंही चिरण्याआधीच धुवायला हवीत. चिरल्यानंतर फळं धुतली तर त्यातील पोषण पाण्यासोबत निघून जाते आणि शरीराला त्यातून आवश्यक घटक मिळत नाहीत.