Join us   

जेवताना अजिबात करु नका ५ चुका, खाल्लेल्या अन्नातून मिळणारच नाही पोषण, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 12:36 PM

Avoid 5 Mistakes While Eating Meals : आहारतज्ज्ञ लवलिन कौर काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्या समजून घेऊया...

आपण जे अन्न घेतो त्यामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते. त्यामुळेच आहारात सर्व गोष्टींचा योग्य प्रमाणात समावेश असावा असे आवर्जून सांगितले जाते. खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रुपांतर होते आणि त्यातून शरीराला आवश्यक असणारे घटक पुरवले जातात. मात्र खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे आपण योग्य प्रमाणात आणि पुरेसे पोषण देणारे अन्न खाल्ले तरी शरीराचे चांगले पोषण होत नाही. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी एकदा नीट तपासून पाहायला हव्यात. काही वेळा कोणत्या अन्नपदार्थांवर कोणते अन्नपदार्थ घेऊ नयेत हे सांगितले जाते. याशिवाय खाण्याच्या वेळा, पाणी पिण्याची पद्धत याबाबत आपल्याला माहित असते तरीही ते आपल्याकडून योग्य पद्धतीने पाळले जातेच असे नाही. म्हणूनच खाण्यापिण्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत आहारतज्ज्ञ लवलिन कौर काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्या समजून घेऊया (Avoid 5 Mistakes While Eating Meals)...

१. जेवणासोबत पाणी पिणे 

ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. अनेकांना २ घास खाल्ले की पाणी पिण्याची सवय असते. अशाप्रकारे जेवताना पाणी पिण्याने तोंडातील लाळेची निर्मिती कमी होते. तसेच अन्न पचनासाठी आवश्यक असणारे रस पोटात तयार होत नाहीत. त्यामुळे पचनाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे खाण्यासोबत पाणी न पिता खाण्याच्या आधी अर्धा तास नाहीतर खाल्ल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यायला हवे. 

(Image : Google)

२. जेवणासोबत सॅलेड खाणे   अन्नाचे पचन व्हावे म्हणून आहारात सॅलेड असायला हवे हे आपल्याला सांगितले जाते. म्हणून आपण जेवणात आवर्जून कच्चे सॅलेड किंवा कोशिंबीरीचा समावेश करतो. यामध्ये साधारणपणे आपण काकडी आवर्जून खातो. पण त्यामुळे निर्माण होणारे रस इतर अन्नपदार्थांचे पचन होण्यास उपयुक्त नसतात. म्हणून सॅलेड कधीही जेवणाच्या आधी खावे आणि मग जेवायला सुरुवात करावी. त्यामुळे व्यवस्थित भूक लागते आणि अन्न पचण्यास मदत होते. 

३. जेवणासोबत किंवा नंतर फळं खाणे

अनेकांना जेवण झाल्यावर फळं खाण्य़ाची सवय असते. फळांमध्ये असणारे फ्रुक्टोज जेवणानंतर लगेच घेतले गेल्यास शरीरातील चांगले बॅक्टेरीया कमी होऊन वाईट बॅक्टेरीया वाढण्याची शक्यता असते. शरीरात फरमेंटेशन झाल्याने ग्लुकोजची पातळी वाढण्याची शक्यता असते. फळ खाताना ते रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी २ तास खायला हवे. 

४. नकारात्मक भावना 

खाताना तुमच्या मनात कोणत्याही नकारात्मक भावना असतील, तुम्हाला खाण्याची इच्छा नसेल, मनात कोणत्या गोष्टीविषयी राग असेल तर अशावेळी अन्न घेणे आरोग्यासाठी चांगले नसते. कारण या भावनांसोबत अन्न आत जात असल्याने या भआवना बळावण्याची शक्यता जास्त असते. 

५. खाताना चुकीच्या अवस्थेत बसणे 

खाताना तुम्ही चुकीच्या किंवा तुम्हाला सोयीच्या नसलेल्या अवस्थेत असाल तर ते अन्न तुम्ही आनंदाने खाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आवडेल, सोयीचे होईल अशा अवस्थेत अन्न खायला हवे. मग अगदी खाली मांडी घालून, टेबलवर असे आपल्या सोयीप्रमाणे खाण्याची पोझिशन असायला हवी. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजना