Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मुलांना पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे गंभीर आजाळ टाळा, इन्फेक्शनचा धोका वाढतो, मुलांची काळजी घ्या!

मुलांना पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे गंभीर आजाळ टाळा, इन्फेक्शनचा धोका वाढतो, मुलांची काळजी घ्या!

पावसाळ्यात मुलं वारंवार आजारी पडू नयेत म्हणून काळजी घ्यायला हवीच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2024 08:00 AM2024-06-23T08:00:00+5:302024-06-23T08:00:02+5:30

पावसाळ्यात मुलं वारंवार आजारी पडू नयेत म्हणून काळजी घ्यायला हवीच.

Avoid serious harm to children due to contaminated water during monsoons, the risk of infection increases, take care of children! | मुलांना पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे गंभीर आजाळ टाळा, इन्फेक्शनचा धोका वाढतो, मुलांची काळजी घ्या!

मुलांना पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे गंभीर आजाळ टाळा, इन्फेक्शनचा धोका वाढतो, मुलांची काळजी घ्या!

डाॅ. संजय जानवळे( एम. डी. बालरोगतज्ज्ञ)

पावसाळा आला की, पावसाच्या नव्या पाण्याबरोबरच साथीच्या रोगांचं थैमान माजतं. अशुद्ध पाणी गॅस्ट्रो, काॅलरा, कावीळ, टायफाॅइड अशा विकारांवर निमंत्रण देतं. पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. थंडीचे प्रमाण सतत कमीजास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरात चालणाऱ्या क्रियांवरही होतो, आपली पचनशक्ती तसेच रोगप्रतिकारशक्ती मंदावते. पावसाळयात अशुद्ध पाण्याचं प्रमाण तसेच दूषित अन्नाचं प्रमाणही वाढलेलं असतं. माशांचं प्रमाणही वाढतं. मग उघड्या खाद्यपदार्थांवर बसणार्या माशा रोग पसरवतात.
पावसाळयात मुलात संसर्गजन्य आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यात प्रामुख्याने व्हायरल फिवर, सर्दी-खोकला, न्युमोनिया, ब्राॅकिंओलायटिस अशा श्वसनाच्या आजाराचा, डासांपासून फैलावणाऱ्या डेंग्यूताप, मलेरिया आणि दुषित पाण्यामुळे होणाऱ्या काविळ, टायफाॅइड त्याचबरोबर लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा समावेश असतो. लहान मुलांत अशा सूक्ष्म जंतूमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजाराविरुद्ध लढणारी प्रतिकारशक्ती अविकसित असते. अशा रोगांपासून मुलांचा बचाव कसा करायचा, याचे पुरेसे ज्ञान पालकांना नसते. त्यामुळेच मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलं संसर्गजन्य रोगाना अधिक बळी पडतात.

काय करायचं?

१. पावसाळा हा पाणी सुध्दा 'फुंकून' पिण्याचा मोसम. दूषित अन्नपाण्यामुळे अतिसार, काविळ, टायफाॅइड अशा आजारांचे प्रमाण वाढते. अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी (डिहायड्रेशन) होते व कुषोपण होते. पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचं अतिसार हे क्रमांक एकचे मृत्यूचे कारण असते.
२. अस्वच्छ परिसर, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि स्तनपानापेक्षा बाटलीने पाजण्याकडे असलेला कल ही अतिसाराचा प्रादुर्भाव होण्याची मुख्य कारणे आहेत. दूषित पाण्यातून पोटात जंतू जातात. स्तनपान, सर्व मुलांना गोवर प्रतिबंधक लसीकरण, संडासाचा वापर, अन्नपदार्थ व पाणी स्वच्छ ठेवले आणि अन्नाला शिवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे या खबरदाऱ्या घेतल्यास अतिसारासारखे आजार टाळता येतात.
३.आजारांचे जंतू पाण्यामध्ये मिसळले की, पाणी दूषित होते. हे जंतू आपल्याकडून किंवा प्राण्यांपासून येतात. हे पाणी वरकरणी स्वच्छ दिसत असले तरी त्यात डोळ्यांना न दिसणाऱ्या अतिसूक्ष्मजंतूमुळे दूषित झालेले असते.

४. पिण्याचे पाणी दूषित नसावे, याची दक्षता घ्या. त्यासाठी पाणी गाळूनव उकळून घ्या. पाणी निर्जंतूक करण्यासाठी ते उकळून ( २० मिनिटे ) घेणे आवश्यक आहे. पाणी फिल्टर असल्याच उत्तम!
५. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत पावसाचा जोर जास्त असल्याने थंड व दमट हवेचे प्रमाण जास्त असते. थंडीमुळे वाताचे प्रमाण जास्त असते. सर्दी - खोकला, दमा यासारखे किरकोळ; पण त्रासदायक आजारही उचल खातात.पावसाळ्यातले हवामान आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल असते. सर्दी-खोकल्यासारख्या हवेतून फैलावण्याऱ्या आजारांपासून मुलांचा बचाव करण्यासाठी श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या रुग्णाचा त्यांच्याशी संपर्क नको. अशा रुग्णात व मुलात कमीत कमी दोन मिटर अंतर असावे.
६. मुलांचे हात वारंवार धुवा, सॅनिटायजर वापरा. तुम्ही शिंकताना,खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्युपेपर धरा. हातांची ओंजळ करुन खोकू नका. त्यासाठी हातांच्या कोपरांचा वापर करा व लगेच हात स्वच्छ धुवा. मुलांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.

हे करा..

१. परिसर स्वच्छ ठेवा. मुलांच्या हातांची नियमित स्वच्छता राखल्यास हिपॅटायटिस ‘ए’, इन्फ्युएन्झा, सर्दी, विषमज्वर, अतिसार इत्यादी आजारांपासून त्यांचा बचाव करता येतो. लहान मुलांची नखे वेळेवर काढा. स्वयंपाक करण्यापुर्वी भाज्या, कडधान्य, डाळी तसेच खाण्यापुर्वी फळे स्वच्छ धुवून घ्या. शिजवलेले अन्नपदार्थ लगेच खाऊ घाला.
२. थंड झालेले अन्नपदार्थ खाण्यापुर्वी पुन्हा गरम करुन घ्या. माशांपासून संरक्षण करण्यासाठी अन्नपदार्थ झाकून ठेवा. भांडी पुसण्याचा कपडा रोज बदला व तो उकळून घेतलेल्या पाण्यानी धुवा. माशांचा बंदोबस्त करण्यासाठी फरशा कोरड्या ठेवा. जंतुनाशकाचा वापर करा.
३. पावसाळ्याच्या पाण्याने बाळाचे केस चिकट होतात; केसात कोंडा होतो. त्यासाठी सौम्य शाम्पु वापरा. पावसाळयात ओले कपडे अंगावर अधिककाळ राहिल्यास मुलाला गजकर्ण, चिखल्या, असे त्वचारोग होऊ शकतात. परंतु ते होऊ नयेत म्हणून स्वच्छता राखा. स्वच्छ पाण्याने अंघोळ घाला व शरीर कोरडे करा.
४. मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुणिया यासारखे आजार डासांमार्फत फैलावता. मुलांना डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणी वापरा. डास पळवून लावण्यासाठी माॅस्क्युटोरिपेलंट, लिक्विडेटरचा वापर करा. त्यासाठी अगरबत्त्यांचा वापर करु नका.
५. जनावरांची लघवी ज्याठिकाणी असेल अशा दुषित झालेल्या चिखलात अथवा साठून राहिलेल्या पाण्यामध्ये अनवाणी पायाने मुलांना खेळू देऊ नका व लेप्टोस्पायरोसिसपासून त्याचा बचाव करा.

एम डी (बालरोगतज्ज्ञ), बीड
dr.sanjayjanwale @gmail.com

Web Title: Avoid serious harm to children due to contaminated water during monsoons, the risk of infection increases, take care of children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.