रात्रभराची शांत झोप झाली की दुसरा दिवस चांगला जातो. पण रात्री गाढ आणि शांत झोप येणे हे अनेकांसाठी आव्हान असते. कित्येकदा या कुशीवरुन त्या कुशीवर झाले तरी आपल्याला म्हणावी तशी शांत झोप येत नाही. कितीही थकून बेडवर पडलो की आपल्याला पुढचा बराच वेळ झोप येत नाही. आता इतकं थकल्यावर झोप यायला हवी असं आपल्याला वाटेल पण झोप का येत नाही? याची काही कारणे असू शकतात. कधी जास्त थकल्यामुळे, कधी डोक्यात खूप विचार सुरू असल्यामुळे किंवा कधी झोपेची वेळ पुढे मागे झाल्याने असे होऊ शकते. पण एकदा झोप गेली की बराच वेळ लागत नाही आणि मग आपण या अंगावरुन त्या अंगावर करत राहतो (Ayurveda Doctor Ankit Share 3 Ayurvedic Herbs To Sleep Fast End Better).
दिवसाची ६ ते ८ तास झोप उत्तम तब्येतीसाठी आवश्यक असते. दिवसभर आपण इतके धावत असतो. त्या शरीराला आणि मनाला पुरेसा आराम मिळाला नाही तर पुढच्या दिवशी नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा राहत नाही. ज्यांची झोप पूर्ण होत नाही अशा व्यक्तींना जीवनशैलीशी निगडीत अनेक आजारांचा सामना करावा लागतो यामध्ये डायबिटीस, बीपी, लठ्ठपणा, हृदयरोग यांचा समावेश असतो. आता चांगली झोप यावी यासाठी काय करायला हवे याविषयी आयुर्वेदात काही सोपे उपाय सांगितले आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अंकित झोप न येणाऱ्यांसाठी ३ औषधी वनस्पतींची माहिती देतात.
१. ब्राम्ही
ब्राम्ही ही अतिशय पटकन कुठेही वाढणारी वनस्पती आहे. आरोग्याच्या इतर तक्रारींबरोबरच ब्राम्ही झोपेसाठी वापरली जाणारी एक अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. केवळ झोप लागण्यासाठीच नाही तर डोकं शांत करण्यासाठीही या वनस्पतीचा चांगला उपयोग होतो. आयुर्वेदात ब्राम्हीला मेंदूसाठीचे टॉनिक म्हणून ओळखले जात असल्याने एकाग्रता वाढण्यासाठीही ब्राम्ही अतिशय उपयुक्त असते.
२. शंखपुष्पी
शरीरातील वात दोष कमी करण्यास उपयुक्त ठरणारी वनस्पती आहे. तसेच मन शांत करण्यासाठी आवश्यक असणारे घटक या वनस्पतीमध्ये असतात. या दोन्ही गोष्टी झोप न येण्यास कारणीभूत ठरु शकतात. तसेच झोप येण्यासाठीही शंखपुष्पीमध्ये अतिशय उपयुक्त असे गुणधर्म असल्याने ज्यांना झोपेची समस्या आहे अशांनी शंखपुष्पी घेतल्यास त्यांना निश्चितच फायदा होतो.
३. जटामासी
ही आपण फारशी न ऐकलेली वनस्पती असली तरी ती आयुर्वेदातील एक महत्त्वाची वनस्पती आहे. मुळ्यांसारखी दिसणारी ही वनस्पती झोपेच्या तक्रारी दूर होण्यास उपयुक्त असते. शरीर आणि मन शांत असेल तर चांगली झोप लागायला मदत होते, जटामासी यासाठी उपयुक्त असते. नैराश्य कमी करण्यासाठीही या वनस्पतीचा उपयोग होतो.