कधी ऑफीसमध्ये तर कधी एखाद्या कार्यक्रमात किंवा अगदी कुठेही एखाद्याने बोलायला तोंड उघडले तर तोंडातून घाण वास येतो. आपण एकमेकांच्या जास्त जवळ असलो तर हा वास काही केल्या लपत नाही. आपल्या तोंडाला असा वास येत असेल तर नकळत लोक आपल्यापासून चार हात लांब राहतात. तोंडाला असा वास येणे आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या दृष्टीने तर चांगले नाहीच पण आरोग्याच्या दृष्टीनेही अशाप्रकारे तोंडाला वास येणे योग्य नाही (Tips To Get Rid from Bad Breath ).तोंडाचा वास येण्यामागे दातांचे आरोग्य चांगले नसणे, पोट साफ नसणे, पाणी कमी पिणे, फुफ्फुसात इन्फेक्शन असणे किंवा डायबिटीस अशी अनेक कारणे असू शकतात. दात स्वच्छ न घासणे, हिरड्या किंवा तोंडाशी संबंधित समस्या, धूम्रपान किंवा तंबाखू खाणे यांसारख्या सवयींमुळेही तोंडाला घाण वास येण्याची शक्यता आहे. पण तोंडाला वास येत असेल तर नकळत लोक आपल्यापासून लांब जातात (Ayurvedic Remedies).
ही समस्या वेळीच दूर करायची असेल तर नेमके काय करायचे हे आपल्याला समजत नाही. कधी मिंट असलेल्या गोळ्या खाणे तर कधी च्युइंगम चघळणे असे उपाय आपण करतो. काही वेळी लवंग चघळणे, सतत चुळा भरणे असे घरगुती उपायही आपण करुन पाहतो. मात्र काही केल्या हा वास जात नाही. अशावेळी करता येईल असा ठोस आणि चांगला उपाय आयुर्वेदीक तज्ज्ञ डॉ. शरद कुलकर्णी यांनी सांगितला आहे. 'नवभारत टाइम्स'ने केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी हा सोपा उपाय सांगितला आहे. डॉ. कुलकर्णी म्हणतात, तोंडाचा वास येऊ नये असे वाटत असेल तर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना असे २ वेळा ब्रश करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच जीभ साफ करणेही अतिशय महत्त्वाचे असून कोणतीही गोष्ट खाल्ल्यानंतर गुळण्या करणे किंवा चुळा भरणे आवश्यक आहे. त्यामुळे दात किडण्याची समस्या तर दूर होईलच पण तोंडाला येणाऱ्या वासाचीही समस्या दूर होण्यास मदत होईल.
१. आलं-मीठ-जीरं आणि ओवा
तोंडाला येणाऱ्या वासाचे कारण पोटाच्या समस्या असेल तर त्यासाठी एक घरगुती पावडर अतिशय उपयुक्त ठरते. आलं किंवा सुंठ पावडर मीठ, जीरं आणि ओवा या सगळ्या गोष्टी एकत्र करुन मिक्सर करा आणि ही पावडर दुपारच्या जेवणाच्या आधी खा. यामुळे पचनाशी निगडीत तक्रारी तर दूर होतीलच पण तोंडाला येणारा वासही दूर होण्यास याची चांगली मदत होईल.
२. लवंग -बडीशोप आणि वेलची
डॉ. कुलकर्णी यांनी आणखी एक उपाय सांगितला आहे. ते म्हणतात, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या किंवा एकत्र करुन चावून खायला हव्यात. त्यामुळे श्वसनाशी निगडीत समस्यांमुळे तोंडाला येणारा वास दूर होण्यास नक्कीच मदत होते.