डोकेदुखी ही आपल्याकडची एक सामान्य समस्या आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना ही डोकेदुखीची समस्या उद्भवते. कधी पचनाच्या तक्रारींमुळे तर कधी सर्दीमुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. मायग्रेन, रक्तदाब वाढल्याने, ताणामुळे किंवा अॅसिडीटीमुळेही काही जण डोकेदुखीने हैराण असतात. अनेकदा डोकेदुखीमागे रक्तदाब वाढणे, मेंदूशी निगडीत समस्या, डोळ्यांच्या तक्रारी याही कारणीभूत असतात. डोकेदुखी सुरू झाली की आपण चहा किंवा कॉफी घेतो. यामुळे काही वेळापुरते बरे वाटते पण कायमचा आराम मिळत नाही (Ayurvedic Tea For Headache Problem).
अनेक जण डोकेदुखीसाठी सर्रास काही ना काही औषधेही घेतात. पण असे करणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते. अशावेळी आयुर्वेदीक चहा अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे डॉ. दिक्षा भावसार सांगतात. थंडीच्या दिवसांत सारखं गरम काहीतरी प्यावसं वाटतं, अशावेळी हा आयुर्वेदीक चहा घेतल्यास डोकेदुखीपासून तर आराम मिळतोच. पण प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही हा चहा फायदेशीर असतो. आता हा चहा कसा करायचा याबाबत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास व्हिडिओ शेअर केला आहे.
हा चहा कसा करायचा...
१. पातेल्यात १ कप पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवायचे.
२. अर्धा चमचा ओवा, १ वेलची आणि १ चमचा धणे या पाण्यात घालायचे.
३. यामध्ये ३ ते ४ पुदिन्याची पाने घालायची आणि हे मिश्रण ३ ते ४ मिनीटे चांगले उकळू द्यायचे.
४. गॅस बंद करुन चहा गाळतो त्याप्रमाणे गाळणीने गाळून हा आयुर्वेदिक चहा गरमागरम प्यायचा.
फायदे
१. ओवा सर्दी-कफ, पचनाच्या तक्रारींपासून डायबिटीस, अस्थमा यांसारख्या तक्रारींपर्यंत अनेक गोष्टींसाठी फायदेशीर असतो. वजन कमी करण्यासाठीही ओव्याचा चांगला उपयोग होतो.
२. धणे हार्मोन्सचे असंतुलन, मायग्रेन, थायरॉईड यांसारख्या समस्यांवर उपयुक्त असल्याने त्या कारणाने डोके दुखत असेल तर आराम मिळतो.
३. पुदीना हा चहाचे व्यसन दूर करण्यासाठी उपयुक्त असतो. अॅसिडीटी, मायग्रेन, कोलेस्टेरॉल, मूड स्विंग्स यांसाठीही पुदीन्याचा वापर फायदेशीर असतो.
४. मोशन सिकनेस, मळमळ, मायग्रेन किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर वेलची अतिशय फायदेशीर ठरते. यातील अँटीऑक्सिडंटस आरोग्यासाठी फायदेशीर असतात.