आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर योगा, व्यायामाला पर्याय नाही. प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव वेगवेगळ्या माध्यमातून व्यायाम आणि आहाराचे महत्व पटवून देताना याच गोष्टी सांगत असतात. देशातच नाही तर जगभरात बाबा रामदेव यांना फॉलो करणारा खूप मोठा वर्ग आहे. व्यायामच नाही तर आहारााबाबतही काही महत्त्वाच्या गोष्टी बाबा रामदेव सांगत असतात. शिळं अन्न आरोग्यासाठी जास्त खाऊ नये असं आपण वारंवार ऐकतो. पण शिळी भाकरी आरोग्यासाठी विशेषत: हाडांसाठी अतिशय फायदेशीर असते. हाडांमध्ये पुरेशी ताकद नसेल तर शरीर मजबूत नसते. हाडं बळकट होण्यासाठी त्यांच्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी असायला हवे. ते कमी असेल तर ऑस्टीओपोरॅसिस होण्याची शक्यता असते (Baba Ramdev Diet tips for strong bones).
आपण लहानपणापासून नियमितपणे सकाळी शिळी बाजरीची भाकरी खात असल्याने आपली हाडं मजबूत आहेत असं बाबा रामदेव यांचं म्हणणं आहे. मुद्दामहून रात्री केलेली भाकरी सकाळी लोण्यासोबत खायला हवी. बाजरीची भाकरी शिळी झाल्यावर त्यावर नैसर्गिकरित्या आंबण्याची प्रक्रिया होते. तसेच शिळी भाकरी पचायला हलकी होते. वयाच्या तिशीनंतर आवर्जून बाजरीची भाकरी खायला हवी. यातील फॉस्फरस, प्रोटीन, कॅल्शियम हाडांची डेन्सिटी टिकवून ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर असतो.
शिळा आहार आरोग्यासाठी चांगला नसतो असा आपला समज असतो. तसेच आपण साधारणपणे पोळ्या खात असल्याने या पोळ्या उरल्या तर आपण फोडणीची पोळी किंवा गूळ तूप पोळी खातो. पण भाकरी शिळी राहीली तर ती कडक होण्याची शक्यता असते. अशी भाकरी दुधासोबत किंवा फोडणीची भाकरी करुन खाल्लास ती चांगली लागते. ताज्या भाजीसोबतही आपण ही शिळी भाकरी नक्कीच खाऊ शकतो. त्यामुळे तुम्हालाही आपली हाडं मजबूत व्हावीत असं वाटत असेल तर शिळी बाजरीची भाकरी आवर्जून खायला हवी.