जन्मानंतर सहा महिने मातेचे दूध हाच बाळासाठी मुख्य आहार असतो. सहा महिन्यांनंतर हळूहळू बाळाला एकेक ठोस आहार भरवण्यास सुरुवात केली जाते. लहान बाळाला काय खाऊ घालावे असे प्रश्न अनेकांना असतातच. पण अनेकदा लहान बाळांच्या हातातही आपण बिस्किट्स पाहतो. अगदी शहरांपासून खेड्यापर्यंत सर्वत्र. मात्र बाजारात मिळणारी बिस्किटं लहान मुलांना द्यावी का? डॉ. अलका विजयन त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये मुलांना बिस्किट खायला दिल्याने त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती देतात. बिस्किटे, कुकीज, रस्क यामुळे मुलांच्या पचनावर परिणाम होतो असं त्या सांगतात.
डॉ. अलका सांगतात, "बिस्कीटमध्ये सहसा मैदा, बॅकिंग पावडर, मीठ, दूध आणि लोणी इत्यादी साहित्यांचा वापर करून तयार होते. जेव्हा हे घटक एकत्र मिसळले जातात, तेव्हा हे मिश्रण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरते. जेव्हा दूध आणि मीठ एकत्र होते, तेव्हा ते दूध दही बनते. बिस्किटांचे पोत कोरडे आणि कुरकुरीत असते. त्यामुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा येतो. यासोबतच बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होऊ शकतो."
मुलांना बिस्किटे खायला देण्याचे तोटे
दररोज बिस्किटे खाल्ल्याने मुलांना बिस्किटांचे व्यसन लागते, ते इतर अन्न खाण्यास नकार देतात.
अतिरिक्त बिस्किटे खाल्ल्याने आतड्याच्या आरोग्यावर परिणाम होतो.
बिस्किटे खाल्ल्याने मुलांना पुरेसे पोषण मिळत नाही, याने प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
बिस्किटे नियमित खाल्ल्याने मुले वारंवार आजारी पडतात. त्यांना खोकला, सर्दी, ताप यासारख्या समस्या वारंवार होतात.
मुलांना कुकीज खायला देण्याऐवजी, उकडलेले आणि ग्रील केलेले पदार्थ खायला द्यावे. हे पदार्थ पौष्टिक आणि निरोगी देखील असतात.