अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्यामुळे घरोघरी सध्या उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी म्हणजे खूप गोष्टींची तयारी. अगदी फराळाच्या तयारीपासून ते घराच्या सजावटीपर्यंत सगळे सगळे दिवाळीत केले जाते. घरातल्या प्रत्येकाला कपडे, पाहुणे- रावळे, नातलग, मित्रमंडळी यांना भेटवस्तू, घर सजावटीचे सामान, किराणा, गोडधोडाचे पदार्थ.... असं किती आणि काय काय दिवाळीत आपल्याला करायचं असतं. हे सगळं करणं तर घरात बसून शक्य नाही. त्यामुळे खरेदीसाठी ओघाने बाहेर जाणं आलंच.
दिवाळीची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंगचा एक उत्तम पर्याय आहे. पण सगळीच खरेदी आपण काही ऑनलाईन पद्धतीने करू शकत नाही. अशा खूप गोष्टी असतात, ज्या बाजारात जाऊन खरेदी केल्याशिवाय आपल्याला दिवाळीचा आनंदच मिळत नाही. म्हणूनच तर सध्या सगळ्याच शहरांमधील, गावांमधील बाजारपेठा नागरिकांच्या वर्दळीने गजबजून गेल्या आहेत. तब्बल एक- दिड वर्ष आपले उग्र रूप दाखविलेल्या कोरोनाचा जणू प्रत्येकाला विसर पडला आहे. दिवाळीचा उत्साहच एवढा जबरदस्त आहे की काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा उच्छाद सुरु होता हे आपल्या गावीही नाही. पण असा हलगर्जीपणा करू नका आणि बाजारपेठेत गर्दी करू नका. कारण नुकत्याच मिळालेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचा उच्छाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये मागच्या २४ तासांत एकूण १४, ३४८ नवे कोरोना रूग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या मागच्या २४ तासांत बरीच वर गेली असून एका दिवसात तब्बल ८०५ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू केरळमध्ये झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. त्यामुळेच तर दिवाळीची खरेदी करण्यासाठी जेव्हा बाहेर जाता, तेव्हा काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने देखील खरेदी करताना काळजी घ्या, कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करा, अशी पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
खरेदीसाठी बाहेर पडताना अशी घ्या काळजी - सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळा सर्वाधिक गर्दीच्या असतात. त्यामुळे या दोन वेळांना घराबाहेर पडणं टाळा. - शक्यतो दुपारी जाऊन तुमची कामं उरकण्याचा प्रयत्न करा. - शक्य होईल तेवढी खरेदी ऑनलाईन साईटवरून करण्याचा प्रयत्न करा. - खरेदीसाठी बाहेर पडताना आज काय सामान खरेदी करायचं आहे, याची यादी तयार करून ठेवा. यामुळे झटपट दुकानं गाठता येतील आणि बाजारात जाऊन आता काय खरेदी करायचं, याचा विचार करण्यात आणि विनाकारण एक- दोन दुकानं अधिकची फिरण्यात वेळ जाणार नाही.
- ज्या दुकानात खूप गर्दी आहे, तिथं जाणं टाळा. - आजकाल घराबाहेर पडल्यावर अनेक जण मास्क सरळ नाकाखाली घेताना दिसतात. असं करणं टाळा. कारण कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. - कोरोना संपला, असे मानून आपण सॅनिटायझर हा विषय कधीच आपल्या पर्समधून गायब करून टाकला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा पर्समध्ये टाका आणि गरजेच्या वेळी त्याचा वापर करा. - जेव्हा आपण कोणत्याही दुकानात जातो, तेव्हा गरज नसताना अनेक वस्तूंना स्पर्श करून बघतो. वस्तूचा पोत बघण्यासाठी हे आवश्यक आहे. पण अगदी चालता- चालता एखादी गोष्ट हातात उचलून बघायची आणि त्याचा भाव विचारायचा अशी सवय अनेक जणींना असते. तुम्हालाही अशी सवय असेल तर बाजारात जाताना हॅण्डग्लॉजचा वापर करा. - हॅण्डग्लोज वापरले तर हातही स्वच्छ राहतील आणि कोरोनचा धोकाही कमी होईल. - लहान मुलांना बाजारात नेणे टाळा.
- लहान मुलांसाठी कपडे खरेदी करताना त्यांना एखादा ड्रेस घालून बघण्याचा मोह टाळा. ड्रेसची ट्रायल शक्यतो घेऊच नका. लहान मुलांना खरेदीसाठी सोबत नेण्यापेक्षा त्यांच्या ड्रेसचे अचूक माप सोबत घेऊन जा आणि तुम्हीच त्यांच्यासाठी खरेदी करा. - बाजारातून आणलेल्या वस्तू सॅनिटाईज करण्याची चांगली सवय आपल्याला कोरोनाकाळात लागली होती. पण आता आपण ही सवय विसरत चाललो आहोत. ही सवय पुन्हा लावून घ्या. शक्यतो घरी आणलेल्या वस्तूला १० ते १२ तास स्पर्श करणे टाळा. - पैशांची देवाणघेवाण करण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंटचा पर्याय वापरणे कधीही सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे.