मला ‘बेड टी’ घेण्याची सवय आहे, सकाळी उठल्या उठल्या कपभर गरम गरम चहा पित नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवातच होत नाही असं कौतुकानं सांगणारे खूप जण आहेत. एक कप गरम चहा पिल्याने अंगातला आळस झटकला जातो, कामाला सुरुवात होते हे बरोबर आहे.पण सकाळी उठल्या उठल्या अगदी तोंड न धुताच आधी चहा पिणं ही कौतुकाची गोष्ट नसून ती वाईट सवय आहे असं तज्ज्ञ सांगतात. अती चहा पिणे हे जेवढं घातक तितकाच एक कप बेड टी घेणेही नुकसानकारक आहे. सकाळी रिकाम्या पोटी एक गरम चहा आरोग्याचय अनेक समस्यांना कारणीभूत ठरु शकतो.
आपल्याकडचं महत्त्वाचं पेय म्हणून चहाकडे बघितलं जातं. पण चुकीच्या वेळेस , चुकीच्या पध्दतीनं चहा घेतल्यानं वाईट परिणाम होतात हे समजून घेणं आवश्यक आहे. ‘आरोग्य डाएट अँण्ड न्यूट्रीशन क्लिनिक’च्या आहारतज्ज्ञ डॉ. सुगीता मुटरेजा या बेड टी पिण्याचे आरोग्यास होणारे तोटे तर सांगतातच पण सकाळी चहा कसा घ्यायला हवा याबाबतही मार्गदर्शन करतात.
Image: Google
रिकाम्या पोटी बेड टी
रिकाम्या पोटी बेड टी घेण्याने अनेक तोटे होतात. रोज छळणार्या छोट्या समस्या ते गंभीर आजार असं या तोट्यांचं व्यापक स्वरुप आहे. आपल्याला या समस्या जाणवतात, त्यावर आपण उपायही शोधतो. पण त्याचं कारण आपल्या रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीत आहे हे मात्र माहित नसतं.
1. मळमळ आणि जीव घाबरणे आयुर्वेदानुसार सकाळी उठल्या उठल्या तोंडही न धुता रिकाम्या पोटी चहा घेतल्याने शरीरात पित्त रस तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. यामुळेच सकाळी जीव मळमळणं, जीव घाबराघुबरा होणं असे त्रास होतात. रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीने उलट्या होण्याचा त्रासही होतो.
2. पोटाच्या गंभीर समस्या
बेड टी पिण्याची सवय असणार्यांना पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही सवय दीर्घकाळापासून जोपासली जात असेल तर अल्सर हा आतड्यांशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. रिकाम्या पोटी गरम चहा पिल्याने पोटातील आतील भागात जखमा होण्याची शक्यता असते. या जखमा पित्ताशयात होतात. पेप्टिक अल्सरचं एक कारण म्हणजे रिकाम्या पोटी बेड टी घेणं हे होय.
3. पोट फुगतं
रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोट फुगतं. विशेषत: दुधाचा चहा घेतल्याने ही समस्या प्रामुख्याने जाणवते. ब्लॅक टी पिणं हे वजन कमी होण्यास, एकूणच आरोग्यास फायदेशीर मानला जातो. पण ब्लॅक टी घेतल्याने देखील पोट फुगण्याची समस्या निर्माण होते.
4. मूड बदलतात-चिडचिड होते
सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिल्याने अंगातला आळस निघून जातो, ऊर्जा मिळते असं म्हटलं जातं. पण रिकाम्या पोटी चहा पिल्यानं शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. शरीरास पाणी कमी पडल्यानं दिवसभर थकवा वाटतो. मूड सतात बदलत असतात. छोट छोट्या गोष्टींवरुनही संताप व्हायला होतं.
Image: Google
5. अँसिडिटीचा त्रास वाढतो
रिकाम्या पोटी चहा घेण्याच्या सवयीमुळे अँसिडिटी होते. जर नेहमीच पोटत गॅसेस होत असतील, अँसिडिटी होत असेल तर या त्रासाचं मूळ आपल्या बेड टीच्या सवयीत आहे हे ओळखावं. रिकाम्या पोटी चहा घेणं, चहा खूप उकळून, परत परत गरम करुन पिणं, जास्त वेळा चहा पिणं या तिन्ही गोष्टीमुळे शरीरातील पित्त वाढतं.
6. पचन बिघडतं
पचन क्रिया उत्तम चालण्यस बेड टीची सवय अडथळा आणते. या सवयीमुळे पचन नीट होत नाही. म्हणूनच बेड टी घेणार्यांना बहुतेकांना गॅसेस, अँसिडिटी, बध्दकोष्ठता, अपचन आणि पोटात जळजळ अशा समस्या जाणवतात.
7. हाडांचं आरोग्य येतं धोक्यात
रिकाम्या पोटी चहा पिणं ही सवय फक्त पचनाशी संबंधित समस्या निर्माण करतात असं नाही तर हाडांच्या आरोग्यासाठीही ही सवय घातक ठरते. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने शरीरात वात दोष वाढतो. शरीरातील वात वाढल्याने हाडं कमजोर होतात. बेड टी घेण्याची समस्या असणार्यांना कमी वयातच सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. रिकाम्या पोटी बेड टी घेतल्याने शरीरातील आतील पाणी कमी होतं. डिहायड्रेशनचा त्रास होतो. यामुळे स्नायुदुखीचा त्रास होतो.
Image: Google
8. बिघडतं मानसिक आरोग्य
चहानं मूड फ्रेश होतो हे खरं. पण सकाळचा रिकाम्या पोटी एक कप चहा घेणं मात्र मानसिक आरोग्याचा विचार करता वाईट सवय आहे. चहा आणि कॉफीत कॅफीनचं प्रमाण जास्त असतं. त्यातच जर रिकाम्या पोटी चहा घेतला, की राग येणं , बारीक सारीक गोष्टींवरुन चिडचिड होण्याचं प्रमाण वाढतं. तसेच यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो.
9. रक्तदाब वाढवणारी सवय
रिकाम्या पोटी एक कप चहा घेतल्याने एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. चहामधील कॅफिन शरीरात लगेच मिसळलं जातं. यामुळे हदयाच्या ठोक्यांची गती वाढते, रक्तदाब वाढतो. बेड टी घेण्याच्या चुकीच्या सवयीमुळे रक्तदाब वाढतो तसेच हदयाच्या आरोग्यासाठी हे फार धोकादायक मानलं जातं.
10. तोंडांचं आरोग्य बिघडतं
बेड टी घेतल्याने तोंडांच आतील आरोग्य खराब होतं. चहातील साखरेमुळे तोंडआत जिवाणू तयार होतात. यामुळे अँसिड वाढतं. दातांवरचं इनॅमल हा संरक्षक घटक निघून जातो. त्यामुळे दाताची संवेदनशिलता वाढते. दातांना कळ लागण्याचं प्रमाण वाढतं.
Image: Google
सकाळी उठल्यावर चहा घेण्याआधी..
1.बेड टी घेणं ही आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक बाब आहे. पण म्हणून चहा पिणं बंद करावं असं नाही. पण बेड टीच्या ऐवजी आरोग्यदायी असे ग्रीन टी, लेमन टी घेऊ शकतात. पण म्हणून सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ग्रीन टी- लेमन टी घेणं हे देखील त्रासदायक ठरतं. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आद्जी चूळ भरुन दात घासावेत. नंतर एक कपभर कोमट पाणी प्यावं. आणि मग अर्ध्या तासानं दूध घातलेला किंवा ग्रीन टी/ लेमन टी थोडं मध घालून घ्यावा.
2. चहा नीट उकळलेला हवा हे बरोबर. पण खूपही उकळू नये.अति उकळलेला चहा रिकाम्या पोटी पिल्याने त्रास होतो. म्हणून पाणी साखर घालून नीट उकळून घ्यावं. ते चांगलं उकळलं की मग पाण्यात चहा पावडर घालावी. चहा पावडर घातल्यानंतर एक दोन मिनिट चहा उकळून घ्यावा. अशा पध्दतीने केलेला चहा आरोग्यास हानिकारक नसतो.
3. अति उकळून चहा पिणं, खूप वेळा चहा घेणं ही वाईट सवय आहे. यामुळेही पचनावर परिणाम होतो.
4. चहामधे तुळशीची पानं यासारख्या औषधी वनस्पतींचा वापर टाळावा. कारण तुळशीतील आरोग्यदायी गुण हे चहातील कॅफिनमुळे शरीरात शोषले जात नाही.