Join us   

वर्क फ्रॉम होममुळे वाकला पाठीचा कणा! मणक्याचे आजार गंभीर, वाचा उपाय काय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 3:47 PM

पाठीच्या दुखण्याच्या या वाढत्या केसेस बघूनच अस्थिरोग तज्ज्ञांनी ‘वर्क फ्रॉम होम’करणार्‍यांना मणक्यांच्या आजाराबाबत धोक्याचा इशारा दिला असून हा धोका टाळण्याचे उपायही सांगितले आहे.

ठळक मुद्दे एका जागी खूप वेळ बसून राहिल्यामुळे स्पाइन डिस्कवरचा हाडांचा दबाव वाढतो.मणक्यांच्या सुरक्षिततेसाठी शरीराची पुरेशी हालचाल होणे, शरीराला खाण्या पिण्यातून योग्य पोषण मिळण्याची गरज असते.तासनतास एका जागी न बसता दर 45 मिनिटांनी कामाच्या जागेवरुन उठावं आणि थोडं फिरुन यावं.

कोरोनानं मानवाचं जगणं अंर्तबाह्य बदललं आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यसंस्कृती कोरोनाचीच तर देण आहे. वर्क फ्रॉम होम कोणाला सोयीचं झालं तर बहुतेकांना गैरसोयीचं. विशेषत: या कार्यसंस्कृतीमधे नोकरदार महिला ज्या सध्या वर्क फ्रॉम होम करतायेत त्या मात्र खूप शिणल्या आहेत. ऑफिसला जावं लागायचं तेव्हा मागे घरातल्या कामाची कटकट तरी नसायची. पण घरात बसून ऑफिसचं काम करावं लागत असल्यामुळे ना घरचं काम संपतं ना ऑफिसचं, यात होणारी दमछाक टोकाची. असा अनुभव अनेक महिला घेत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे ऑफिसचं काम वेळ उलटून गेली तरी संपतच नाही. तासनतास एकाच जागी बसून काम करणं ही बाब शारीरिक आणि मानसिक थकवा आणणारी आहे.तासनतास एका जागी बसणं हे किती घातक आहे हे आता अनेक अनुभवातून समोर येत आहे. अस्थिरोगतज्ज्ञांकडे गेल्या वर्षीपासून पाठीच्या दुखण्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण येत आहे. अनेक केसेसमधे तर दुखणं इतकं टोकाचं होतं की मणक्यांवर शस्त्रक्रिया करावी लागत आहे. पाठीच्या दुखण्याच्या या वाढत्या केसेस बघूनच अस्थिरोग तज्ज्ञांनी ‘वर्क फ्रॉम होम’करणार्‍यांना मणक्यांच्या आजाराबाबत धोक्याचा इशारा दिला असून हा धोका टाळण्याचे उपायही सांगितले आहे.

छायाचित्र:- गुगल

काय म्हणताहेत डॉक्टर?

‘इंटरव्हेशनल पेन अँण्ड स्पाइन सेंटर’ साउथ विभागाच्या संचालक डॉ. स्वाती भट म्हणतात की, वर्क फ्रॉम होम या कार्य संस्कृतीनं केवळ आपली कामाची पध्दत बदलली नाही तर त्याचा आरोग्यावरही दूरगामी परिणाम झाला आहे आणि होतो आहे. या नव्या कार्य संस्कृतीमुळे एका जागी बसण्याचा कालावधी प्रमाणापेक्षा जास्त वाढला आहे. एका जागी खूप वेळ बसून राहिल्यामुळे मणक्याच्या तबकडीवरचा अर्थात स्पाइन डिस्कवरचा दबाव वाढतो. स्पाइब डिस्क हा शरीराच्या हालचालीसाठी अत्यंत आवश्यक असलेला भाग आहे. एकच जगी बसून राहिल्याने हालचाली कमी होतात. त्यामुळे स्पाइन डिस्कवर हाडांचा दबाव वाढतो आणि त्या दाबल्या जातात. घरी बसून काम करताना खाण्या पिण्याकडे, पोषणाकडेही दुर्लक्ष होतं आहे. इतकंच नाही तर पुरेसं पिणंही टाळलं जात आहे. यामुळे पाठीची दुखणी वाढली आहे तसेच कमी पाणी पिल्यानं स्पाइन डिस्कमधील ओलावा कमी होतो आणि ती कमजोर होते.

छायाचित्र:- गुगल

डॉ. स्वाती भट म्हणतात की, प्रामुख्याने 20 ते 40 वयोगटातले स्त्री पुरुष भयंकर पाठ दुखत असल्याच्या तक्रारी घेऊन अस्थिरोग तज्ज्ञांकडे येत आहे. पाठीचं दुखणं हे केवळ पाठीचं नसतं. अशा दुखण्यात मणक्यांना धोका असतो. मणक्यांसंबधी काही त्रास शस्त्रक्रिया , औषधोपचार करुन बरे होतात पण काही दुखणे आयुष्यभराचं अपंगत्त्व आणतात. अर्थात मणक्यांची अशी दुखणी एका रात्रीत जाणवत आणि उद्भवत नाही. आपलं शरीर खूप आधीपासून त्याबाबत सूचना देत असतं. पण कामाच्या गडबडीत त्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय मग दुखणं इतकं वाढवून घेतात की अगदी शस्त्रक्रिया करण्यापर्यंतची वेळ येते. तर कधी अपंग म्हणून जगण्याची. त्यामुळे थोडसं जरी शरीर कुरकुरलं तर लगेच लक्ष द्यावं. ही काळजी घेतल्यास दुखणी हाताबाहेर जाण्याआधी मर्यादित उपचारांनी बरी होतात.

छायाचित्र:- गुगल

वर्क फ्रॉम होम करताना घ्या काळजी..

वर्क फॉम होम करतान पाठीच्या दुखण्याकडे जराही दुर्लक्ष करु नका असं आवाहन डॉ. स्वाती भट करतात . सोबतच घरुन काम करताना पाठदुखी आणि मणक्यांच्या आजाराचा धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

1. प्रत्येक घरात ऑफिसचं काम करण्यासाठी वेगळी जागा असेल असं नाही. बहुतांश घरात ती नसतेच. अनेकजण ( स्त्री/पुरुष) बेडवर बसून तासनतास ऑफिसचं काम करतात. पण ही सवय चुकीची आहे. या वर्क फ्रॉम होम या कार्यसंस्कृतीची भविष्यातील गरज आणि कालावधी बघता हे दीर्घकाळ चालणार आहे. त्यामुळे घरात कामाला व्यवस्थित बसता येईल अशी जागा शोधावी. पाठदुखी, मणक्यांच्या आजारात बसण्याची चुकीची पध्दत कारणीभूत ठरते. त्यामुळे घरात कामासाठी योग्य जागा करणे.

2 कामासाठी एक विशिष्ट जागा केली तरी तासनतास त्या एका जागेवर न बसता थोड्या थोड्या वेळानें ( किमान दोन तासानं) कामाची जागा बदलावी. दोन तास जर बेडव बसून काम केलं तर दोन तास स्वयंपाकघरात, दोन तास बैठकीच्या खोलीत, गॅलरीत बसून काम करावं.

3 दिवसभरात पुरेसं पाणी पिण्याची काळजी घ्यायला हवी. कारण तरच शरीरात ओलावा राहातो. आपण घरी असू देत किंवा ऑफिसला जात असू पण आपल्या पेशी मात्र सतत आपल्यासाठी काम करत सतात्. त्यांना अन्न पाण्यातून पुरेसं पोषण मिळणं गरजेचं असतं.

4 घरी बसून काम करताना कामाला प्राधान्य दिल्या गेल्यामुळे जेवण तयार असूनही जेवणाच्या वेळा चुकत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. ही सवयही आरोग्यासाठी धोकादायक आहे. शांतपणे जेवण्यासाठी 10 मिनिटं लागतात. तेवढा वेळ काढायलाच हवा. काम करताना खाण्या पिण्याचं भान राहात नसेल तर ऑफिसला जाताना आपण जसं डबा आणि पाण्याची बाटली भरुन नेतो तसं घरी बसून काम करतानाही करावं. यामुळे जेवणाच्या वेळा पाळल्या जातील आणि अवेळी जेवणाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळले जातील

5. तासनतास एका जागी न बसता दर 45 मिनिटांनी कामाच्या जागेवरुन उठावं. एका खोलीतून दुसर्‍या खोलीत चालून पाय मोकळे करावेत. फोनवर दीर्घकाळ बोलायचं असेल तर एका जागी बसून न बोलता फिरत फिरत बोलावं.

6. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या छोट्या दुखण्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. एखादं दुखणं आठवडाभरापेक्षाही जास्त काळ त्रास देत असेल तर लगेच डॉक्टरांना गाठावं.

वर्कफ्रॉम होम ही कामाची सोय आहे पण म्हणून आरोग्याची गैरसोय करुन घेण्याची गरज नाही असं डॉ. स्वाती भट म्हणतात.