प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीही ३० वर्ष वयाची वाटणारी शिल्पा व्यायाम आणि आहाराला आपल्या रुटीनमध्ये खूप महत्त्व देते. इतकंच नाही तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांनाही त्याबाबत कायम जागरुक करण्याचा प्रयत्न करत असते. कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने कोरफड आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कोरफड आरोग्य आणि सौंदर्यासाठी अतिशय उपयुक्त असून आयुर्वेदात तिचे खूप महत्त्व सांगितले आहे (Benefits Of Aloe Vera Juice). पोटाच्या समस्या, त्वचेच्या समस्या तसेच केसांसाठी कोरफड अतिशय उपयुक्त असते. इतकेच नाही तर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठीही कोरफडीचा उपयोग होतो.
शिल्पा शेट्टी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून कोरफडीचे फायदे सांगते. टॉपिकल जेल म्हणून ओळखली जाणारी कोरफड सनबर्नसाठी उपयुक्त असतेच पण आरोग्याच्या कित्येक तक्रारींसाठी या जेलचा चांगला उपयोग होतो. या पोस्टमध्ये शिल्पा कोरफडीचे फायदे सांगत आपल्या चाहत्यांना महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करते. सिंपल सोलफूल अॅप नावाच्या इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून तिने ही पोस्ट केली आहे. एरवीही कधी आरोग्याच्या तक्रारींसाठी काही व्यायामप्रकार तर कधी आहाराशी निगडीत टीप्स देऊन ती फिटनेसविषयी जागरुकता करण्याचा प्रयत्न करते. कोरफडीचा ज्यूस नियमित प्यायल्यास शरीराला होणारे फायदे कोणते ते पाहूया
१. अँटीऑक्सिडंटचे भरपूर प्रमाण
कोरफडीमध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटीऑक्सिडंटडचे प्रमाण जास्त असल्याने शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोरफडीचा गर खाणे किंवा ज्यूस पिणे फायद्याचे ठरते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर शुद्ध होते. सकाळी उपाशी पोटी कोरफडीचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.
२. रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास फायदेशीर
कोरफडीमध्ये अँटीडायबिटीक गुण असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी ती अतिशय फायदेशीर असते. कोरफडीचा ज्यूस नियमित घेतल्यास टाइप २ असलेल्या रुग्णांना त्याचा चांगला फायदा होतो. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हा ज्यूस फायदेशीर असल्याने त्याचे सेवन करायला हवे.
३. पचनशक्ती सुधारण्यास मदत
अॅसिडीटी, गॅसेस आणि अपचनाची समस्या असणाऱ्यांनी कोरफडीचा ज्यूस घेतल्यास फायदा होतो. यामध्ये लॅक्झेटीव्ह तत्त्व असल्याने पोट साफ होण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
४. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
सततची बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या पद्धती यांमुळे वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढली आहे. मात्र कोरफडीचा ज्यूस घेतल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते आणि वजन घटण्यासाठी कोरफडीचा चांगला फायदा होतो. याशिवाय नुसते वजन कमी होत नाही तर शरीराला ऊर्जा मिळण्यासाठीही कोरफडीचा चांगला उपयोग होतो.