Join us   

मळमळ-लघवीचा त्रास- उन्हाने हैराण? धण्या-जिऱ्याचे पाणी पिण्याचे ५ फायदे- स्वस्तात मस्त उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2023 10:56 PM

Benefits Of Drinking Coriander - Cumin Seeds Water : उन्हाचा त्रास कमी करायचा, डिहायड्रेशन टाळायचं तर प्यायला हवं धण्या-जिऱ्याचं पाणी

धणे - जिरे हे प्रामुख्याने मसाल्यांचे पदार्थ आहेत. आपण आपल्या रोजच्या स्वयंपाकात धणे - जिऱ्याचा वापर आवर्जून करतो. धणे - जिरे पावडरचा वापर केल्याने पदार्थांना खूप चांगली चव येते. धण्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात. धण्यासोबतच जिरेदेखील शरीरासाठी अतिशय उत्तम असतं. जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. त्याचबरोबर यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. धणे आणि जिरे एकत्र केल्यास त्याचा शरीरावर चांगला फायदा होतो. 

उन्हाळ्यांत उष्णतेमुळे आपल्याला फार घाम येतो. गरमी आणि उष्णतेच्या झळांमुळे जीव अगदी कासावीस होतो. उन्हाळ्यांत वाढत्या तापमानामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. यासाठीच उन्हाळ्यात सतत पाणी, फळांचे रस, यांसारखे द्रव पदार्थ पीत राहून स्वतःला हायड्रेटेड ठेवले पाहिजे. उन्हाळ्यांत आपण शहाळचे पाणी, लिंबू पाणी, फळांचे रस, कोकम सरबत अशी पारंपरिक शीतपेय पिणे पसंत करतो. उन्हाळ्यात या शीतपेयांच्या जोडीला धणे - जिऱ्याचे पाणी पिणे हे देखील फायदेशीर ठरु शकते(Benefits Of Drinking Coriander - Cumin Seeds Water). 

धणे - जिऱ्याचे पाणी कसे तयार करायचे ? 

१. एका भांड्यांमध्ये दोन ग्लास पाणी घ्या त्यात एक चमचा धणे, एक चमचा जिरे आणि पाच ते सहा काळ्या मनूका घाला.  २. सकाळी त्या पाण्यातून काळ्या मनूका बाहेर काढा त्या चमच्याने  स्मॅश करा आणि त्याचा गर गाळून घ्या.  ३. जिरे आणि धण्याचं पाणीदेखील गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यात काळ्या मनूक्यांचा गर आणि पत्री खडीसाखरेचे एक किंवा दोन खडे घाला.  ४. साखर विरघळ्यावर सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्या.  ५. जर आपल्याजवळ अख्खे धणे किंवा जिरे नसेल तर सकाळी एक ग्लास पाण्यात आपण धणे जिरे पावडरदेखील मिसळून ते पेय तयार करू शकता. 

धणे - जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे :- 

१. रोगप्रतिकारशक्ती वाढते :- धण्यामध्ये अ‍ॅटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. धण्यामुळे वातावरणातील होणाऱ्या बदलांपासून आपलं रक्षण होतं. शिवाय जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अ‍ॅटिऑक्सिडंट आजारपणाला सामोरं जाण्याची ताकत वाढवतात. जिरं देखील आपली प्रतिकारशक्ती वाढवतं. ज्यामुळे आपल्याला सर्दी,खोकला असे आजार कमी होतात. 

२. मासिक पाळीचा त्रास कमी होतो :- मासिक पाळीत अनेक महिलांना पोटात किंवा कंबरेत क्रॅंम्प येतात. दिवसभर थकल्यासारखं वाटतं. अशावेळी धणे-जिऱ्याच्या पाण्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. धण्यामधील दाहशामक गुणधर्म आणि जिऱ्यामधील फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम या मिनरल्समुळे आपल्याला मासिक पाळीत होणारा त्रास कमी करण्यास मदत होते. 

३. पचनसंंस्था सुधारते :- आजकाल अवेळी जेवण करणे, बराचकाळ उपाशी राहणं, रात्री उशीरा जेवणे या जीवनशैलीमुळे अनेकांना पचनाच्या समस्या जाणवतात. मात्र धणे आणि जिऱ्याचं पाणी पिण्यामुळे आपल्या पचनसंस्थेला चालना मिळते. ज्यामुळे आपल्या पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. धणे आणि जिऱ्याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगलं पचत. यासाठीच नियमित धणे-जिऱ्याचं पाणी पिणं शरीरासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतं. 

४. त्वचेसाठी उत्तम :- धणे जिऱ्याचं पाणी  नियमित पिण्यामुळे आपली त्वचा डिटॉक्स होते. धण्यामधील अ‍ॅटिऑक्सिडंट आपल्या त्वचेचं इनफेक्शनपासून  संरक्षण करतात. जिऱ्यामधील व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर आपण धणे जिऱ्याचं पाणी रोज घेतलं तर आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज येत. चेहऱ्यावरील अ‍ॅक्नेची  समस्या दूर होते. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शनपासूनही रक्षणच होतं. 

५. तोंडाची दुर्गंधी कमी होते :- कांदा,लसणाचे पदार्थ अती प्रमाणात खाण्यामुळे किंवा तोंडाच्या आरोग्य समस्येमुळे तोंडातून सतत घाणेरडा वास येण्याची समस्या असते. मात्र धणे आणि जिरे हे उत्तम मुखवास म्हणून देखील वापरले जाते. यासाठीच जर आपण नियमित धणे-जिऱ्याचं पाणी प्यायलात तर आपल्याला  या समस्येपासून नक्कीच मुक्ती मिळू शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य