उन्हाळा हळूहळू वाढायला लागला की आपल्याला उष्णतेचे त्रास भेडसावू लागतात. यामध्ये तोंड येणे, पुरळ येणे, जळजळ होणे, लघवीच्या समस्या अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील थंडावा कायम ठेवण्यासाठी आपण आहारात बदल करतो. उन्हाळा सुरू झाला की पाणी जास्त पिणे, पाणीदार फळं खाणे, सरबत, दही, ताक यांचा आहारात समावेश करणे असे उपाय केले जातात. यामध्ये आवर्जून खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे गुलकंद. आयुर्वेदातही गुलकंदाला बरेच महत्त्व आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून केला जाणारा हा गुलकंद अतिशय चविष्ट असतो. त्यामुळे लहान मुलेही तो आवडीने खातात. गुलकंद नुसता खाल्ला तरी चालतो. पण तो दूधातून घेतलेला अधिक चांगला. याशिवाय गुलकंदाचा शिरा, लाडू, फालुदा असे गुलकंदाचे काही पदार्थही करता येतात. पाहूयात उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे (Benefits Of Gulkand In Summer)...
१. उष्णता कमी करण्यास फायदेशीर
अनेकदा उन्हाळ्यात लघवीला जळजळ होणे,अॅसिडीटी, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवतात.तोंड आलं असल्यास, तोंडात चट्टे, फोडं आली असल्यास गुलकंद खाणं उपयुक्त ठरतं. तसेच गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे व्हिटॅमिन बी ची कमतरता असणाऱ्यांनी गुलकंद नियमित खावा.
२. बद्धकोष्ठता
ज्यांना नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी आवर्जून गुलकंद खायला हवा. जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं, यामुळे पचन चांगल होतं आणि बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते. गुलकंद आपल्या आतड्यांतील उपयुक्त ठरणारा गट बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला जेवण पचवणं सोपं होतं. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामधील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देण्यास मदत करते.
३. स्मरणशक्तीसाठी फायदेशीर
आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करत असतो. मुलांना नियमित गुलकंद दिल्यास, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदा होतो. वास्तविक गुलकंदामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुण हे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यास उपयुक्त असतात.
४. त्वचा सतेज राहण्यास मदत
गुलकंदामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. दररोज गुलकंद खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचा उजळते. तसेच गुलकंद खाल्ल्याने ब्लॅकहेड्स, पिंपल्स यांसारख्या त्वचेच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.
५. हृदयासाठी फायदेशीर
उत्तम आरोग्यासाठी हृदय निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत ठेण्यासाठी नियमित गुलकंद खाण्याचा उपयोग होतो.