Join us   

आठवड्यात दोनदा खा मसूर डाळ, लालचुटूक डाळीचे ५ फायदे- रोजच्या स्वयंपाकात तिला हवं मानाचं स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 4:52 PM

Benefits of having masoor dal in diet : प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असणारी ही डाळ खायलाच हवीत

प्रोटीन म्हणजेच प्रथिने ही शरीरात तयार होत नाहीत तर ती आपल्याला आहारातून घ्यावी लागतात. आपली प्रत्येकाची प्रथिनांची गरज ही आपल्या वजनाइतकी असते. त्यामुळेच आपल्या प्रत्येक जेवणात प्रथिनांचा आवर्जून समावेश असायला हवा असे सांगितले जाते. मांसाहार करणाऱ्यांचे ठिक आहे पण शाकाहार करणाऱ्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. मात्र शाकाहार करणाऱ्यांनी आहारात पनीर, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, डाळी यांचा समावेश केल्यास त्यांनाही चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळू शकतात. आपण साधारणपणे तूर डाळ, हरभरा डाळ आणि मूग डाळीचा आहारात समावेश करतो. पण मसूर डाळ म्हणजेच केशरी रंगाची डाळ आपण आहारात घेतोच असे नाही. पण ही डाळ आरोग्यासाठी अतिशय चांगली असते तसेच ती पचायलाही हलकी असल्याने या डाळीचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. पाहूयात मसूर डाळ खाण्याचे फायदे (Benefits of having masoor dal in diet) 

१. वजन कमी करण्यास उपयुक्त

वजनवाढी ही सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावणारी समस्या आहे. मसूर  डाळीतील ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नकळतच वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. 

(Image : Google)

२. डोळ्यांसाठी फायदेशीर 

या डाळी मधून विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई मुबलक प्रमाणात मिळतं. तसेच प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंटमुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. दृष्टी अंधुक होणे, डोळ्यांची आग-जळजळ यांसारख्या समस्या भेडसावतात. पण मसूर डाळीचा आहारात समावेश केल्यास या समस्या कमी होण्यास मदत होते. 

३. हाडांचे आरोग्य चांगले राहते

या डाळीमधून चांगल्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मिळतं, ज्यामुळे हाडांचं आरोग्य चांगले राहतं. ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांशी निगडीत समस्येचा धोका कमी होण्यासाठी मसूर डाळ फायदेशीर ठरते. तसेच मसूर डाळीतील गुणधर्मांमुळे स्नायूंची ताकद चांगली राहते. 

४. पचनक्रियेसाठी फायदेशीर

आपली पचनक्रिया सुरळीत असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तूर किंवा हरभरा डाळ पचायला थोडी जड असते. मात्र मसूर डाळ मूगाच्या डाळीप्रमाणे पचायला हलकी असल्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं.मसूर डाळीमुळे वातदोष वाढतो आणि कफ आणि पित्त दोष बॅलन्स राहतात.

५. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत 

मसूर डाळीमध्ये असणारे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस पचण्याची क्रिया संथ असते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी ही डाळ खाणे फायद्याचे ठरते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना