गेल्या आठवड्यापासून राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आंबा, फणस, कलिंगड, खरबूज यांसारखी खास उन्हाळ्यात येणारी फळं एव्हाना मनसोक्त खाऊन झाली असतील. आता पावसामुळे आपण केळी, पेरु यांसारखी सर्दीला कारणीभूत ठरणारी फळं तर खाऊ शकत नाही. याशिवाय या काळात इतर फळंही फारशी उपलब्ध नसतात. असलीच तरीही ती खराब असण्याची शक्यताच जास्त. पण या काळात बाजारात जागोजागी दिसणारे फळ म्हणजे जांभूळ (Benefits of Jamun Fruit).
झाडावरुन खाली पडली की पटकन फुटणारी ही जांभळं अतिशय सावकाश काढावी लागतात. गेल्या काही वर्षांत आंब्यापेक्षा जास्त भाव खाणाऱ्या या जांभळांचे आयुर्वेदातही बरेच महत्त्व सांगितले आहे. विविध प्रकारच्या औषधांमध्ये वापरले जाणारे हे जांभूळ पावसाळ्याच्या काळात आवर्जून खायला हवे. आंबट-गोड आणि थोडेसे तुरट असे हे जांभूळ खाण्याचे आरोग्याला काय फायदे होतात ते समजून घेऊया...
१. रोगप्रतिकारशक्ती वाढते
उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की हवेत बराच बदल होतो. एकीकडे गारठा, दमटपणा आणि मधेच उकाडा अशा हवेत संसर्गजन्य आजारांना सुरुवात होते. या वातावरणात प्रतिकारशक्ती कमी होण्याची आणि त्यामुळे आजारपणं ओढवण्याची शक्यता असते. मात्र जांभळांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आवश्यक असे घटक असतात. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळतात, तसेच रक्ताची कमतरताही दूर होते.
२. शुगर कमी होण्यास फायदेशीर
मधुमेह ही सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली समस्या आहे. अगदी तरुणांनाही मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास मधुमेहाची समस्या गुंतागुंतीची होत जाते. मात्र हे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
३. शरीर डिटॉक्स करते
जांभळात फ्लावोनाईड्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यास मदत करतात. जांभळं डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात. त्यामुळे शरीर शुद्ध करण्यासाठी जामून शॉटस, जांभळाचे सरबत किंवा जांभळं खाण्याचा सल्ला दिला जातो.
४. अपचनाचा त्रास होतो दूर
पावसाळ्याच्या दरम्यान दमट हवेमुळे किंवा अशुद्ध पाण्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते. पोटाच्या विविध समस्या दूर होण्यासाठी जांभळं खाणं फायदेशीर ठरतं. पोटदुखी, अपचनाचा त्रास कमी होण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच आहारात जांभळाचा समावेश करायला हवा.