ऋतू बदलला की आपला आहार बदलतो. थंडीच्या दिवसांत गरमागरम काही ना काही खाणारे आपण उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीदार आणि गार गोष्टी खातो. निसर्ग पण ऋतूला साजेशी अशी फळांची निर्मिती करत असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असल्याने आपण खरबूज, कलिंगड यांसारखी फळं आवर्जून खातो. शरीराला ऊर्जा देणारा आंबाही या काळात आवर्जून खाल्ला जातो. याशिवाय शहाळं, फणसाचे गरे, जांभूळ अशी स्थानिक फळं खायला हवीत असं आहारतज्ज्ञ सांगतात. याबरोबरच कोकणात पिकणारे पण फारसे न खाल्ले जाणारे आणखी एक फळ म्हणजे ताडगोळा. उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात गाड्यांवर हे फळ दिसतं पण आपण ते फारसं खात नाही. मात्र पाणीदार असलेलं हे फळ उन्हाळ्यात आवर्जून खायला हवं. किडणीचं आरोग्य चांगले राहण्यासाठी हे फळ उपुयक्त ठरते. प्र सिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ ताडगोळे खाण्याचे ४ फायदे सांगतात, ते कोणते पाहूया (Benefits Of Tadgola Ice Apple Summer Special)...
१. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत
नैसर्गिक कूलंट म्हणून काम करणारे ताडगोळे उन्हाळ्यात आवर्जून खायला हवेत. शरीराचे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी या फळाचा चांगला फायदा होतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास त्याचा चांगला फायदा होतो.
२. पोषक तत्वांनी समृद्ध
ताडगोळ्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे सूक्ष्म घटक असतात. ज्यामुळे शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाईटसचे संतुलन राखण्यास मदत होते. उन्हाळ्यात डीहायड्रेशन होऊ नये आणि थकवा दूर व्हावा यासाठी ताडगोळे आवर्जून खायला हवेत.
३. त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
ताडगोळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजनची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त असते. यामध्ये असणारे प्रोटीन त्वचेचा आकार आणि रचना चांगली राखण्यास मदत करते. फ्रि रॅडीकल्समुळे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठीही व्हिटॅमिन सीचा चांगला उपयोग होतो.
४. कमीत कमी कॅलरीज
आपल्याला सतत वजन वाढण्याची चिंता असते. त्यामुळे कमीत कमी खॅळरी असलेला आहार घेण्याला अनेकदा आपण प्राधन्य देतो. ताडगोळे हे त्यादृष्टीने अतिशय उपयुक्त असे फळ आहे. १०० ग्रॅमच्या एका या फळात केवळ ४३ कॅलरीज असतात. त्यामुळे आरोग्याच्यादृष्टीने हे फळ अतिशय उपयुक्त असते.